
गणशोत्सवाचे ध्वनिवर्धक वाजविण्यासाठीचे दिवस -
- 31 ऑगस्ट सातवा दिवस (गौरी विसर्जन)
- 2 सप्टेंबर नववा दिवस (विसर्जन)
- 3 सप्टेंबर दहावा दिवस
- 5 सप्टेंबर बारावा दिवस (अनंत चतुर्दशी)
पुणे - गणेशोत्सवात कमी गर्दी होणाऱ्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्याची चूक अखेर जिल्हा प्रशासनाने दुरुस्त केली. आता गौरी विसर्जनानंतर उसळणाऱ्या सातव्या, नवव्या आणि दहाव्या तसेच विसर्जनाच्या बाराव्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आधीच्या निर्णयानुसार दुसऱ्या, पाचव्या, सातव्या आणि बाराव्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. मात्र, दुसरा आणि पाचवा दिवस फारसा गर्दीचा नसतो. त्यामुळे आता गर्दी उसळणाऱ्या दिवसांचा समावेश त्यात करण्यात आल्याने पुणेकरांना उत्सवाचा आनंद मोठ्या प्रमाणावर लुटता येईल.
राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या "ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रण नियम, 2000', च्या कलम 5 (3) नुसार ध्वनिवर्धकच्या वापरासंदर्भात "आवाजाची मर्यादा' राखून सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंतची सूट देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशानुसार, यंदाच्या वर्षी गणशोत्सवामध्ये गौरी विसर्जनाचा सातवा दिवस (ता.31), नववा दिवस (ता.2 सप्टेंबर), दहावा दिवस (ता.3 सप्टेंबर) तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी (बारावा दिवस) सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यात आली आहे.
ध्वनिवर्धक वाजविण्यासाठीचे नियम व अटी ः
- निर्धारित चार दिवसांमध्ये सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी
- ध्वनी प्रदूषण नियम, 2000 नुसार विहित ध्वनी मर्यादेत ध्वनिवर्धक वाजविणे बंधनकारक
- "झोनिंग'प्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेवू नये
- ध्वनीचे शोषण करणारे विशिष्ट लाकडी सामग्री आवश्यक त्या ठिकाणी लावणे बंधनकारक
- शांतता क्षेत्रात ही परवानगी लागू असणार नाही, त्या ठिकाणी ध्वनिवर्धक वाजविण्यास बंदी कायम
आणखी एक दिवस मिळण्याची शक्यता
ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर वर्षातील 15 दिवसांचे अधिकार दिले आहेत. त्यापैकी अन्य धार्मिक सणांमध्ये पाच दिवसांची परवानगी दिली आहे. त्यामुळे उर्वरित दहा दिवसांपैकी चार दिवसांची परवानगी दिली आहे. त्यामध्ये नवरात्री उत्सवाचे दोन दिवस, दिवाळीचा एक दिवस, ख्रिसमसचा एक, 31 डिसेंबरचा एक या दिवसांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त आणखी एक दिवस राखीव आहे. आवश्यकता भासल्यास हा दिवस देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय देऊ शकतात. त्यामुळे आणखी एक दिवस मिळण्याची शक्यता आहे.