चिंचवडमध्ये साडेदहा तास रंगला विसर्जन सोहळा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 September 2018

पिंपरी - फुलांची उधळण, ढोल-ताशांचा दणदणाट, थिरकणारी तरुणाई, "गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या' अशा भक्तिमय वातावरण रविवारी भक्‍तांनी आपल्या लाडक्‍या गणरायाला निरोप दिला. गेल्या तीन वर्षांपासूनची डीजे आणि गुलालविरहित मिरवणुकीची परंपरा यंदाही कायम होती. तब्बल साडेदहा तास हा विसर्जन सोहळा रंगला. 

पिंपरी - फुलांची उधळण, ढोल-ताशांचा दणदणाट, थिरकणारी तरुणाई, "गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या' अशा भक्तिमय वातावरण रविवारी भक्‍तांनी आपल्या लाडक्‍या गणरायाला निरोप दिला. गेल्या तीन वर्षांपासूनची डीजे आणि गुलालविरहित मिरवणुकीची परंपरा यंदाही कायम होती. तब्बल साडेदहा तास हा विसर्जन सोहळा रंगला. 

दुपारी दोन वाजता चिंचवडमधील मोरया मित्र मंडळाच्या गणपतीचे चापेकर चौकातून थेरगाव घाटाकडे प्रस्थान झाले. त्यानंतरच्या सहा तासांत रात्री आठपर्यंत फक्‍त सहा सार्वजनिक मंडळांच्या गणपती मिरवणुका चापेकर चौकात आल्या होत्या. त्यानंतर रात्री पावणेनऊच्या सुमारास श्री दत्त मित्र मंडळाची मिरवणूक वाजत गाजत फुलांची उधळण करीत आली. समर्थ कॉलनी मित्र मंडळाच्या मिरवणुकीनंतर क्रांतिवीर भगतसिंग मित्र मंडळाचे गणराज पालखीतून आले. या मिरवणुकीत महिलांचाही मोठा सहभाग होता. मिरवणुकीत खरी रंगत रात्री साडेनऊनंतर आली. संत ज्ञानेश्‍वर मित्र मंडळ (चिंचवडचा राजा) यांच्या मिरवणुकीत अग्नितांडव आणि वाघजाई तरुण झांज ढोलताशे पथकाने खेळ सादर केले. पावणेदहा वाजता श्री काळभैरवनाथ मित्र मंडळाच्या मिरवणुकीचे आगमन झाले. या वेळी ज्ञान प्रबोधिनीच्या पथकाने वादन केले. महागाईचा भस्मासुर हा देखावा यांनी सादर केला. 

दहा वाजता ओमसाई मित्र मंडळानंतर उत्कृष्ट तरुण मंडळाची मिरवणूक आली. त्यात स्वामी समर्थांची मूर्ती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. या मंडळाने मोठ्या प्रमाणात फुलांची उधळण केली. जय गुरुदत्त मित्र मंडळाच्या गणपतीनंतर सूर्य रथातून आदर्श तरुण मंडळाचे गणराज चापेकर चौकात आले. साडेदहाच्या सुमारास गावडे कॉलनी मित्र मंडळाचा गणपती मयूर रथातून आले. त्यानंतर देवदेवतांच्या मूर्ती असलेला रथातून गांधीपेठ तालीम मंडळाचे गणराज हलगीवादन करीत चौकात आले. पावणे अकरा वाजता एम्पायर इस्टेट मित्र मंडळाची मिरवणूक चौकात आली. मुंजोबा मित्र मंडळाने फुलांची आरास केलेल्या रथातून मिरवणूक काढली होती. समर्थ मित्र मंडळाच्या मिरवणुकीत असलेली तिरुपती बालाजीची मूर्ती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. श्री लक्ष्मीनगर मित्र मंडळाचे गणराज मयूर रथात विराजमान झाले होते. या मंडळाने तोफेतून फुलांची उधळण केली. रात्री अकरा वाजता शिवाजी उदय मंडळाची मिरवणूक राजहंस रथातून चौकात आली. नवतरुण मित्र मंडळाने राजा पंढरीचा हा देखावा मिरवणुकीत सादर केली. सव्वाअकरा वाजता गावडे पार्क मित्र मंडळाने बालाजी रथातून मिरवणूक काढली. 

"कब तक राह देखू राम मंदिर की', असे वाक्‍य लिहिलेल्या रथातून मयूरेश्‍वर मित्र मंडळाचे गणराज चापेकर चौकात साडेअकरा वाजता दाखल झाले. आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या रथातून भोईर कॉलनी मित्र मंडळाची मिरवणूक आली. मयूर रथातून आलेल्या सुदर्शन मित्र मंडळानंतर पावणेबारा वाजता श्री दत्त मित्र मंडळाची मिरवणूक आली. समता तरुण मित्र मंडळासमोर ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थिनींनी ढोल-ताशा वादनासह टपरीचा खेळ सादर केला. छत्रपती शाहू मंडळाचा गणपती श्री राम रथातून चापेकर चौकात आले. त्यानंतर समाधान मित्र मंडळ, शिवगर्जना मित्र मंडळ आणि राणाप्रताप मित्र मंडळाच्या मिरवणुकीने रात्री साडेबारा वाजता विसर्जन सोहळ्याची सांगता झाली. 

-डीजे आणि गुलालविरहित मिरवणुकीची परंपरा कायम 
- फुलांची उधळण करण्यात मंडळाचे प्राधान्य 
- मिरवणुकीमध्ये महिलांचा वाढता सहभाग 
- अनेक मंडळांकडून नेत्रदीपक विद्युत रोषणाई 
- बेटी बचाव, पाणी वाचवा असे मंडळांकडून संदेश 
- राम मंदिर आणि महागाईकडे वेधले मंडळांनी लक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2018 Chinchwad 10.5 hours Ganesh immersion ceremony