पुणे - ""प्रथेप्रमाणे उभ्या गौरी आम्ही बसवतो. पिढ्यान् पिढ्यांचे पितळ्यांचे मुखवटे आणि शाडूचे मुखवटेही आमच्याकडे असतात. ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची हार-वेण्यांनी सालंकृत पूजाअर्जा करतो. दुपारी पंचपक्वानांसह गोविंदविड्याचा नैवेद्य दाखवितो. सुख-समृद्धीचे प्रतीक म्हणून गौरीपूजन आणि भोजनाचा कार्यक्रम असल्याने सायंकाळी गौरीच्या दर्शनाला आलेल्या महिलांसाठी पानसुपारी आणि हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आवर्जून करतो,'' गृहिणी सुमती गिजरे यांनी सांगितलेली त्यांच्या कुटुंबातील गौरी उत्सवाची ही प्रथा. अनेकांच्या घरी त्यांच्या प्रथा-परंपरेनुसार भोजनासाठी नैवेद्याचे अनेकविध पदार्थही करण्यात आले होते.

अनुराधा नक्षत्रावर शनिवारी घरोघरी गौरींचे आगमन झाले. रविवारी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी भोजन व पूजनाचा दिवस होता. या निमित्ताने घरोघरी सकाळपासूनच महिला वर्ग तयारीला लागल्याचे पाहायला मिळाले. कोणाकडे खड्याच्या गौरी (गंगागौर), कोणाकडे उभ्या, तर कोणाकडे एकच उभी गौर बसविण्यात येते. कोणाकडे तांबे-पितळ्याच्या तांब्यांवर गौरीचा मुखवटा रेखाटून त्यांची पूजा मांडण्यात आली होती.
गिजरे म्हणाल्या, ""बदलत्या काळानुसार आणि प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे काही बदल झाले आहेत. मात्र आमच्याकडे पूर्वीपासूनची प्रथा-परंपरा आम्ही जपली आहे. गौरी भोजनासाठी गवार, कार्ले, भेंडी, बटाट्याची भाजी, गव्हाची खीर, आळूची भाजी यांसारखे विविध पदार्थ आवर्जून करतो. दुपारी पुरणाचे दिवे करून महालक्ष्मीची आरती करतो. गौरीला कापसाची माळावस्त्रे, अलंकारांनी सजवतो. घरची मंडळी एकत्रित येऊन गौरीची आरती करतो. महिलांना हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलावतो. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतो.''
शकुंतला पवार म्हणाल्या, ""आमच्याकडे देवीचे कान उघडणीचा कार्यक्रम असतो. याप्रसंगी आम्ही गौरीची गाणी म्हणतो. गौरीचे दोरे सवाष्णींच्या पदरात देतो.''