Ganesh Festival : त्वमेव केवलं कर्तासि..!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 September 2018

गणपती...म्हणजे मंगलकारक विद्येची देवता. कोणत्याही कार्याचा आरंभबिंदू हा ‘श्रीगणेशा’ असतो. चराचर व्यापून टाकणारा, बाल, वृद्धांना आकर्षित करणारा हा गणनायक म्हणजे प्रत्यक्ष तत्त्व, केवळ कर्ता, धर्ता अन्‌ हर्ताही. तो सर्व रूपांत विराजमान ब्रह्म असून, साक्षात नित्य आत्मस्वरूप आहे. आनंदमय, ब्रह्ममय, सच्चिदानंद अद्वितीय असणारा हा हेरंब म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचा अथांग सागर. या अखिल ब्रह्मांडनायकाच्या उत्सवाला आजपासून प्रारंभ होतो आहे. पुढील दहा दिवस चालणाऱ्या या भक्तीच्या ‘गणेशयागा’त प्रेम, चैतन्य, सांस्कृतिक वारसा, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा सुरेख संगम पाहायला मिळेल.

गणपती...म्हणजे मंगलकारक विद्येची देवता. कोणत्याही कार्याचा आरंभबिंदू हा ‘श्रीगणेशा’ असतो. चराचर व्यापून टाकणारा, बाल, वृद्धांना आकर्षित करणारा हा गणनायक म्हणजे प्रत्यक्ष तत्त्व, केवळ कर्ता, धर्ता अन्‌ हर्ताही. तो सर्व रूपांत विराजमान ब्रह्म असून, साक्षात नित्य आत्मस्वरूप आहे. आनंदमय, ब्रह्ममय, सच्चिदानंद अद्वितीय असणारा हा हेरंब म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचा अथांग सागर. या अखिल ब्रह्मांडनायकाच्या उत्सवाला आजपासून प्रारंभ होतो आहे. पुढील दहा दिवस चालणाऱ्या या भक्तीच्या ‘गणेशयागा’त प्रेम, चैतन्य, सांस्कृतिक वारसा, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा सुरेख संगम पाहायला मिळेल.

सर्वसिद्धिकारक गणेशाचा उत्सव हा महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून आता अन्य राज्यांप्रमाणेच सातासमुद्रापार पोचला आहे. पोटापाण्यासाठी परेदशांत स्थिरावलेले अनिवासी भारतीयही दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. बाप्पांचं दहा दिवसांचं वास्तव्य अध्यात्माचं अनोखं सेलिब्रेशन असतं. या काळात जात, पात, धर्म आणि पंथ यांची कृत्रिम बंधनं आपोआप गळून पडतात आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं गणरायाच्या आराधनेत तल्लीन होऊन जातो. बाप्पा म्हणजे फक्त ढोलताशा आणि स्पीकरचा आवाज नाही. ती अंतरात्म्याची ज्ञानमयी साद असते. ती तुमच्यातील अनिष्ट रूढी, परंपरा आणि वाईट विचारांना दाखवून देते. ‘‘माणूस म्हणून एक व्हा, आता आणखी किती दिवस असे भांडत राहणार,’’ असा तिचा दरवर्षीचा सांगावा असतो. बाप्पा जसा जमाव गोळा करतो तसाच तो त्याला वळणही देतो. फक्त त्याचं म्हणणं शांतपणे ध्यानस्थ होऊन ऐकावं लागतं. मग हे ध्यान कुठंही करा, मंडपात किंवा तुमच्या देव्हाऱ्यासमोर. आता येणारे दहा दिवस तो चोवीस तास ऑनलाइन असेल, त्याच्याशी चॅट करायचं असेल तर नेटपॅकचीही गरज लागत नाही. तुम्ही फक्त डोळे बंद करा आणि ‘बाप्पा हाय’ म्हणा. तो लगेच रिप्लाय देईल. इथं वेटिंग वगैरे काही नसतं. फक्त संवाद असतो आत्म्याचा आत्म्याशी; हितगूज असतं सर्वव्यापी कल्याणाचं. तुम्ही त्याच्याकडं मोकळ्या मनानं काहीही मागा, त्याच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडेल. तथास्तु..!

************
हा तथास्तु म्हणजे चिरंजीव, चिरंतन आशीर्वाद. जगण्याची उमेद देणारा, माणसातलं माणूसपण जागवणारा, ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणारा आणि तुम्हाला तुमचं अस्तित्व दाखवून देणारा एक अक्षय प्रेरणास्रोत.

दीडपर्यंत मुहूर्त
गुरुवारी पहाटे साडेचार (ब्राह्म मुहूर्त) ते दुपारी दीड वाजेपर्यंत आपापल्या सोयीने पार्थिव गणेशाची स्थापना करावी, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

भाद्रपद शुद्ध चतुर्थी (गणेश चतुर्थी) ते भाद्रपद शुद्ध चतुर्दशी(अनंत चतुर्दशी)दरम्यान घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. यासाठीच्या मुहूर्ताबाबत दाते म्हणाले, ‘पार्थिव गणेशाच्या स्थापनेसाठी पहाटे ब्राह्म मुहूर्त म्हणजेच साडेचार वाजेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत चांगला काळ आहे. या दिवशी सूर्योदयापासून दुपारी २ वाजून ५२ मिनिटांपर्यंत भद्रा आहे, तरीसुद्धा श्री गणेश स्थापनेसाठी भद्रा दोष नाही. त्यामुळे पहाटे ब्राह्म मुहूर्तापासून दुपारी दीड वाजेपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने कोणत्याही वेळी श्री गणेशाची स्थापना करून पूजन करता येईल.’ 

यंदा गौरी  आवाहन लवकर  
भाद्रपदात गौरी (महालक्ष्मी) पूजनालाही विशेष महत्त्व आहे. साधारणतः प्रतिवर्षी गौरी आवाहन सप्तमीला, पूजन अष्टमीला तर विसर्जन नवमीला होत असते; मात्र यंदा ते एक दिवस अगोदर आले आहे. भाद्रपदातील गौरींचे अनुराधा नक्षत्रावर आगमन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन तर मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. यंदा अनुराधा नक्षत्र शनिवारी (ता. १५) दिवसभर म्हणजे मध्यरात्रीपर्यंत असल्याने आपापल्या सोयीने गौरींचे आवाहन करावे. रविवारी (ता. १६) ज्येष्ठा नक्षत्रही दिवसभर आहे. त्यामुळे पूजन व नैवेद्य आपापल्या सोयीने दिवसभर केव्हाही करता येणार आहे. सोमवारी (ता. १७) मूळ नक्षत्रही दिवसभर असल्याने आपापल्या सोयीने गौरी विसर्जन करावे, असेही दाते यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2018 pune ganesh ustav