Ganesh Festival : सांबरवाडीतील दर्ग्यात होते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

सांगली - विद्येची देवता असलेल्या गणेशाची शिकवण खऱ्या अर्थाने आचरणात आणणारी कृतिशील परंपरा सांबरवाडी (ता. मिरज) येथील ग्रामस्थांनी जपली आहे. बारा वर्षे गणेशोत्सव हाजी गाजीबाबा दर्ग्यात साजरा होतो.

सांगली - विद्येची देवता असलेल्या गणेशाची शिकवण खऱ्या अर्थाने आचरणात आणणारी कृतिशील परंपरा सांबरवाडी (ता. मिरज) येथील ग्रामस्थांनी जपली आहे. बारा वर्षे गणेशोत्सव हाजी गाजीबाबा दर्ग्यात साजरा होतो. गावकरी एकत्र येऊन ‘एक गाव - एक गणपती’ उत्सव करतात. ११ दिवस बाप्पांची आराधना, हाजी गाजीबाबांची भक्ती एकाच वेळी 
सुरू असते.

सामाजिक, जातीय सलोखा जपणाऱ्या सांबरवाडीकरांचे वेगळेपण म्हणजे दर्ग्यातच हिंदूधर्मीयांच्या आराध्य देवतेची प्रतिष्ठापना केली जाते. हजारभर लोकवस्तीच्या 
गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही. मध्यवर्ती ठिकाणी हाजी गाजी दर्गा आहे. त्याचे दैनंदिन व्यवस्थापन गावकरी करतात. शेजारच्या कुमठे येथून मुल्लाणी येऊन प्रार्थना करतात.

गावात सार्वजनिक गणेशोत्सवाची पंरपरा नव्हती. बारा वर्षांपूर्वी तो करण्याचे ठरले. तेव्हा गणपती कोठे बसवायचा, असा प्रश्‍नच निर्माण झाला. सर्वांनी दर्ग्याला पसंती दिली. श्री बाल गणेशोत्सव मंडळाचा उत्सव सात किंवा ११ दिवस असतो. भजन-कीर्तन, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांचे खेळ, प्रसाद असे कार्यक्रम होतात. हल्ली रक्तदान, क्रीडा स्पर्धा, वृक्षारोपण असे उपक्रमही राबविले जातात. गुरुवारी हाजी गाजीबाबांची प्रार्थना आणि गणेशाची आरती एकत्र होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन गावकऱ्यांचे कौतुक केले.

सांगलीपासून १५ किलोमीटरवरचे सांबरवाडी ९० टक्के मराठा समाजाचे गाव. सर्वांचा व्यवसाय शेती. शेतीतील सधनतेमुळे राजकारण जोरात. पण, जातीय किंवा धार्मिक संघर्षाचे वारे नाही. हाजी गाजी दर्ग्याचा नेमका इतिहास हल्लीच्या तरुणांना किंबहुना गणेशोत्सव करणाऱ्या नव्या पिढीला माहीत नाही. गाव छोटे आहे. उत्सव, जयंती-पुण्यतिथी, सभा-बैठका यासाठी गाजीबाबांचा दर्गा म्हणजे हक्काचे ठिकाण. अकरा दिवसांचा पाहुणा असलेल्या बाप्पालाही त्यामुळेच दर्ग्यात स्थान देण्यात आले. सांबरवाडीकरांचा हा आदर्श जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. 

उत्सवासाठी बबन शिंदे, उदयसिंग रजपूत, मोहनराव शिंदे, ज्ञानेश्‍वर शिंदे, अभिजित रजपूत, रणजित मुळीक, मानसिंग शिंदे, अंकुश काटकर, नौशाद मुल्लाणी, नेताजी शिंदे, करण काटकर, मनोज काटकर, वेदांत काटकर, सुधीर काटकर, केशव काटकर, दिलीप काटकर, संतोष शिंदे, भगत शिंदे आदी कार्यकर्ते पुढाकार घेतात. 

फेब्रुवारीत पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी उरूस होतो. त्यात तरुणाई हिरीरीने भाग घेते. दिवाळीपेक्षा जास्त खर्च उरुसात होतो. मोहरमही जल्लोषात होतो. गलेफ, गंधरात्र असे धार्मिक विधी हिंदू धर्मीयही करतात. सलोखा राखणे हे ध्येय आहे. त्यात सातत्य ठेवलेय.
- बबन शिंदे,
कार्यकर्ते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Moharam integration special