Ganesh Festival : कुरुंदवाडनगरीत पाच मशिदींत गणेशोत्सव

अनिल केरीपाळे
Sunday, 16 September 2018

कुरुंदवाड - कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थानकालीन नगरपरिषद असलेल्या कुरुंदवाडमध्ये सर्वाधिक मराठा पाठोपाठ मुस्लिमनंतर दलित, धनगर, जैन, लिंगायत व अन्य धर्मीय अशी जातनिहाय लोकसंख्या आहे. अठरापगड जातीधर्म, पंथ, पक्ष, विचारधारेचे लोक अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहतात.

कुरुंदवाड - कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थानकालीन नगरपरिषद असलेल्या कुरुंदवाडमध्ये सर्वाधिक मराठा पाठोपाठ मुस्लिमनंतर दलित, धनगर, जैन, लिंगायत व अन्य धर्मीय अशी जातनिहाय लोकसंख्या आहे. अठरापगड जातीधर्म, पंथ, पक्ष, विचारधारेचे लोक अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहतात. या शहरात गणपती व हजरत दौलतशहा वलींना ग्रामदैवतेचा दर्जा आहे. ३५-४० वर्षांपासून पाच मशिदीत होणारी गणपतीची प्रतिष्ठापना ही सामाजिक सलोख्याची वीण घट्ट करणारी परंपरा इथल्या हिंदू- मुस्लिमांनी निर्माण केली आहे. 

कुरुंदवाडकरांनी ऐक्‍याचा नवा आदर्श धर्म मार्तंडासमोर ठेवला. ज्यावेळी राज्यात वा देशात धार्मिक तेढ तणाव निर्माण होतो, त्यावेळी कुरुंदवाडच्या मशिदीतील गणपती, मोहरमधील हिंदू बांधवांचा जोशपूर्ण सहभागाचा आवर्जून उल्लेख होतो. पटवर्धन संस्थानिकापासूनच शहरात सामाजिक सलोखा राखण्याची निर्माण झालेली परंपरा आजअखेर कायम आहे.

श्री गणेश हे पटवर्धनांचे कुलदैवत असलेतरी संस्थानिक इथल्या बडेनालसाब पीरपंजा (सरकारी पीर) ची सेवा मोठ्या भक्तीभावाने करीत होते. मोहरममध्ये १० व्या दिवशी बडेनालसाब पीर राजवाड्यात जाऊन कुलदैवत गणपतीचे दर्शन घेऊन नंतर अन्य पीरपंजाची भेट घेतात. इथे मोहरमही हिंदूच साजरा करतात. मुस्लिम बांधवांची ना मोहरमबाबत तक्रार ना पाच मशिदीत गणपती बसवण्यास आक्षेप.

१९८२ रोजी सर्वप्रथम कारखाना पीर, ढेपणपूर मशीद, बैरगदार मशीद, शेळके मशीद व कुडेखान मशीद अशा पाच मशिदीत श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापना केली. दिलावर बारगीर, अरुण चव्हाण, विलास निटवे, रामसिंग रजपूत, इलाई भिलवडे, महादेव माळी, गुलाब गरगरे, बाबासो भबिरे, रसूल बागवान, आप्पा भोसले, वली पैलवान, शंकर पाटील, हिंदुराव खराडे, जहांगीर घोरी, गुंडू बागडी, बापू आसंगे, खबाले गुरुजी आदींनी त्यात पुढाकार घेतला. देशात बाबरी मशीद पतनानंतर व २००९ रोजी झालेल्या मिरज दंगलीत हिंदू-मुस्लिम संघर्ष झाला तरी त्याचा विपरीत परिणाम इथल्या उत्सवात झाला नाही.

मोहरम-गणेशोत्सवाची यंदा पुन्हा पर्वणी
तिथीनुसार मोहरम व गणपती सण साधारणतः ३४ वर्षांनी एकत्र येतात. १९८४ नंतर यंदा ही पर्वणी आली आहे. श्रींची मूर्ती व पीरपंजाची प्रतिष्ठापना मशिदीत यापूर्वी झाली होती आणि यावर्षीही होणार आहे. यामुळे दोन्ही सण उत्सव एकत्र आल्याने आनंद आणखी द्विगुणित होणार आहे. पटवर्धन संस्थानिकाबरोबरच तत्कालीन दि गणेश बॅंकेचे सर्वेसर्वा का. स. जोशी यांनीही भूगंधर्व रहिमत खाँ यांच्या स्मरणार्थ संगीत रजनी सुरू केली. बैरगदार मशिदीच्या जीर्णोद्धारात पुढाकार घेतला.

कुरुंदवाड शहरातील सामाजिक सलोखा दिशादर्शक आहे. हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होतात. शहरात जातीय तणाव होत नाही. मशिदीतील गणपती व मोहरमनिमित्त शहरातील सलोख्याचा गौरव होतो, हे भूषणावह आहे.
- अक्षय आलासे, 

प्रभारी नगराध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Moharam integration special