समाजाच्या गणेशोत्सवाकडून अपेक्षा

श्रीकांत शेटे
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

गणेशोत्सवानिमित्त मान्यवरांनी यापूर्वी व्यक्त केलेली मते पुनर्प्रकाशित करत आहोत. सदर लेख २०१६ मधील आहे.

धार्मिकता आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ असलेल्या गणेशोत्सवातील चांगल्या आराशीपासून ते उत्साही मिरवणुकीपर्यंत आपण आनंदाने भाग घेऊ, पण त्याचबरोबर पुण्यातील तुमचं-आमचं जिणं अधिक सुसह्य बनवण्यासाठी कार्यकर्त्यांची सकारात्मक ऊर्जा कारणी लावली तर? पुण्याचे ग्रामदैवत असलेले कसबा गणपती मंडळ नदी स्वच्छता, कचरा आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी आपल्या कार्यकर्त्यांची आणि महापालिका-पोलिस प्रशासनाच्या प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करणार आहे.

हे कार्यकर्ते या प्रश्‍नांवर उपाय सुचवतीलच, पण आपल्या फावल्या वेळात रस्त्यावर उतरून वाहतुकीला शिस्तही लावतील...

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला जवळपास 125 वर्षांची परंपरा आहे. लोकमान्य टिळक यांनी उत्सवाला सार्वजनिक रूप देण्याचे कारण पारतंत्र्य आणि सामाजिक अराजकता हे होते. सार्वजनिक गणेशोत्सव हे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि समाजाचे एकत्रीकरण करण्यासाठी प्रभावी माध्यम होते. स्वातंत्र्यानंतर सुरवातीच्या काळात देशभक्ती प्रखर करण्यासाठी, समाज संघटित होण्यासाठी गणेशोत्सवाचा फार मोठा वाटा आहे. त्यानंतर मेळावे, नंतर विविध गुणदर्शन, भावगीते, भजन, कथाकथन, विविध मेळावे, हास्य कार्यक्रम, मनोरंजनपर कार्यक्रम यांचा सहभाग होऊन काळानुरूप बदल होत गेला. परंतु गणेशोत्सवाचे स्वरूप हे पारंपरिकच राहिले.

गणेशोत्सवातील देखाव्यांत प्रथम पौराणिक आणि नंतर काळानुरूप सामाजिक समस्या, भारतीय सेनेचा पराक्रम, साथीच्या रोगांवर उपाय, स्रीभ्रूणहत्येला विरोध असे अनेक विषय देखाव्यांतून लोकांपर्यंत पोचविले जाऊ लागले. अलीकडच्या काळापासून जाहिरातींमुळे मंडळांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आणि आधुनिक तंत्राची जोड पण मिळू लागली. सामाजिक कार्य नुसतेच देखाव्यात नाही तर गणेशोत्सव मंडळे हिरिरीने करायला लागली.

गणेशोत्सव साजरा करण्यात खूप काही सामाजिक आणि वैयक्तिक फायदे आहेत. पुढाकार घेण्याची-समाज संघटनाची वृत्ती, सामाजिक बांधिलकीचे भान, समाजकार्य, सांघिक कामगिरी, उत्कृष्ट व्यवस्थापनाचे धडे, प्रभावी वक्तृत्व, एकी, उत्साह, आनंद, धार्मिकता, नवीन गोष्टी शिकणे व आत्मसात करणे असे एक ना अनेक फायदे गणेशोत्सव साजरा करण्यात आहेत. परंतु गणेश तत्त्वाला बाधा आणणाऱ्या मंडपाखाली दारू पिणे, वेडेवाकडे अंगविपेक्ष करत नाचणे, मोठे स्पीकर लावणे या वाईट बाबीही त्यात आहेत. यावर वेळीच अंकुश ठेवला गेला पाहिजे. श्री कसबा गणपती मंडळाने एक पाऊल पुढे जात 20 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. त्यापैकी दोन महिलांना थेट विश्‍वस्तपदासाठी निवडून विश्‍वस्त मंडळात मानाचे स्थान दिलेले आहे. त्यामुळे महिलांच्या अंगीभूत गुणांना-कौशल्याला योग्य तो वाव मिळू शकतो. संपूर्ण उत्सवात महिला सहभागी झाल्या तर निश्‍चितपणे उत्सवात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बदलून जाईल.

मिरवणुकीत गुलाल वापरायचा नाही हा निर्णय ""श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ'' यांनी घेतला आणि बाकीच्या मंडळांनी त्याचे अनुकरण करत गुलाल वापरणे बंद केले. तसेच मागील वर्षी दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर हौदात श्री गणेशाचे विसर्जन याला पाठिंबा व अनुकरणसुद्धा खूप मंडळे आणि वैयक्तिक पातळीवर घेण्यात आला. 2014 साली हौदात सुमारे 32000 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. परंतु आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतल्यावर हाच आकडा 2015 साली जवळपास 2,92,000 पर्यंत गेला. ""श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा''ने घेतलेला हा निर्णय/विचार जनमानसात पटकन रुजला. एक प्रकारची सकारात्मकता आहे, तसेच ही सामाजिक एकी, बांधिलकी गणेशोत्सवात नक्कीच आहे. 

पुण्यातील समस्या मुख्यत्वे तीन आहेत. 1) नदी स्वच्छता, 2) कचरा, 3) वाहतूक 

नदीच्या स्वच्छतेसाठी जपानबरोबर करार केलेला आहे. त्याच्या अंमलबजावणीत जर गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची सकारात्मक ऊर्जा वापरली गेली, तर खूप चांगले काम होऊ शकते. प्रशासन व गणेशोत्सव कार्यकर्ते यांची समिती स्थापन केली, तर त्याचा पुण्यासाठी उपयोग होईल. 

तसेच कचऱ्याची समस्या आणि त्याचे निवारण यासाठीसुद्धा त्या-त्या भागातील गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते यांच्या बरोबर चर्चा केल्यास, त्यांना सहभागी करून घेतल्यास कचराविषयक प्रश्‍न नक्कीच मार्गी लागेल.

वाहतूक समस्या या बाबतीत पण गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सकारात्मक काम करू शकतात. प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या भागातील रस्ते, वाहतूक कोंडी, त्याची कारणे याची माहिती असते, उपाय पण माहिती असू शकतात, गरज आहे ती फक्त शासनाने त्यांना मार्गदर्शन करण्याची, त्यांना विश्‍वासात घेण्याची. प्रत्येक भागात कार्यकर्त्यांच्या सहभागातून आपत्कालीन मदत केंद्र स्थापन केले, तर अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळू शकेल आणि उपचारावाचून प्राण जाण्याचे प्रमाण पण कमी होईल.

गणेशोत्सव हा पुण्याचा गौरवशाली इतिहास आहे. पुण्याचे एकेक वैशिष्ट्य आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्य झाली आहेत आणि होत आहेत. शहरांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कार्यकर्त्यांची सकारात्मक ऊर्जा नक्कीच उपयोगी पडेल. हा गौरवशील, देदिप्यमान इतिहास आणि परंपरा असणारा गणेशोत्सव प्रशासन, गणेशोत्सव मंडळ आणि समाजातील सर्व घटक यांनी एकत्रितरीत्या साजरा केला तर त्यातून चांगल्याच गोष्टी निष्पन्न होतील. 

- श्रीकांत शेटे, अध्यक्ष, श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: History of Ganeshotsav in Pune