पेणच्या मूर्तिशाळांनी गाठला 60 कोटींचा पल्ला 

File photo
File photo

पेण : आंब्याचा विषय निघाला की देवगड हापूस, आग्रा म्हटले की ताजमहाल डोळ्यांसमोर दिसतो. अगदी तोच मान गणेशमूर्तींच्या बाबतीत रायगड जिल्ह्यातील पेण या शहराला आहे. गणेशमूर्तींच्या शाळा आणि पेण हे समीकरण काळाच्या ओघात अधिकाधिक घट्ट झाले आहे. जवळपास वर्षभर चालणारा गणेशमूर्तीनिर्मितीच्या व्यवसायाने सध्या वार्षिक 50 ते 60 कोटी रुपये एवढ्या उलाढालीचा पल्ला गाठला आहे. यात दर वर्षी वाढ होत चालली आहे. 

गणेशमूर्तींच्या निर्मितीचा शतकोत्तर वारसा लाभलेले पेण शहर देशाच्याच नाही तर जगाच्या नकाशावर ओळख बनवून आहे. त्यामुळे केवळ मुंबई, पुणे व इतर राज्यांतसह येथील मूर्तींना सातासमुद्रापारही मागणी आहे. या शहरात पाऊल टाकल्यानंतर ठिकठिकाणी गणेशमूर्तिशाळाच दृष्टीस पडतात. पेण शहरासह परिसरातील 20 ते 22 हजार कुटुंबे या व्यवसायात आहेत. यातून एक लाखापेक्षा जास्त रोजगारनिर्मिती झाली आहे. याचे श्रेय येथील देवधर कुटुंबीयांना जाते. 18 व्या शतकात मूळचे विजयदुर्गचे असणारे भिकाजीपंत देवधर हे पेणला आले. त्यांनीच या व्यवसायाची मुहूर्तमेढ येथे रोवली. 

पेणचा ब्रॅंड 
पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाचे विशेष म्हणजे, ही सर्व मंडळी स्थानिक आहेत. अनंत चतुर्दशीनंतर 10 दिवस विश्रांती घेतल्यानंतर या मंडळींची पुढील वर्षीच्या मूर्ती घडविण्याची लगबग सुरू होते. यानंतर अनेक वर्षांच्या ठरावीक वेळापत्रकाप्रमाणे टप्प्याटप्प्याने मूर्ती घडविण्याचे काम वेग घेते आणि साधारण जुलैपासूनच या मूर्तींची पाठवणी सुरू होते. प्रत्येक मूर्तिशाळेत किमान दोन ते तीन हजार मूर्ती तयार होतात. प्रत्येक मूर्तीची किंमत किमान पाचशे ते सातशे रुपये असते. गणेशमूर्तींच्या साचेबद्ध कामामुळे खरा कलाकार लोप पावत असल्याची खंत येथील गणेश मूर्तिकार व्यावसायिक व कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी व्यक्त केली. 

सार्वजनिकरणाचा लाभ 
पेणमध्ये 18 व्या शतकात आलेल्या भिकाजीपंत देवधर यांनी मातीच्या मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. 1860 ते 1920 पर्यंत येथील लोक आपल्या अंगणातील माती खणून त्याच्या गणेशमूर्ती बनवून त्या पूजत. 1940 ते 1950 या काळात लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिल्यानंतर पेण येथील देवधरांनी याचा लाभ उठवला. पेणमधील साधारण 70 ते 80 कारागीरांची फौज तयार करून त्या वेळी 200 ते 300 मूर्ती बनविण्यास सुरवात केली. प्रत्येक कारागीराला 2 ते 5 रुपये पगार दिवसाला मिळू लागला. तयार झालेल्या गणेशमूर्ती मुंबई आणि पुण्याला विकण्यासाठी ते गणेशोत्सवाच्या 10 ते 20 दिवस आधी घेऊन जात. देवधरांच्या तिसऱ्या पिढीतील राजाभाऊ देवधर आणि वामनराव देवधर यांनी मुंबईतील प्रदर्शनाला भेट देऊन 'पीओपी'च्या मूर्ती, रबरापासून साचे तयार करण्याचे तंत्र शिकून घेतले. सध्याच्या पिढीतील श्रीकांत देवधर यांनी या कलेला सातासमुद्रापार नेले. ते जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी देशांत जाऊन गणेश मूर्तिकलेच्या कार्यशाळा घेतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com