गणेशोत्सवाला ज्ञानसत्राचे स्वरूप 

File photo
File photo

पुण्यात पेशवे दरबारी गणेशोत्सव दिमाखदार पद्धतीने साजरा होत असे. सरदार घराण्यांनी ही प्रथा-परंपरा जपली. सरदार मुजुमदार, पटवर्धन, दीक्षित यांच्याही घरी हा उत्सव होत असे. मात्र ब्रिटिशांविरुद्धचा असंतोष प्रगट होण्याकरीता आणि जनमानसातील स्वातंत्र्याप्रतीची चेतना जागृत करण्याकरीता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. व्याख्याने, चर्चासत्रे, मेळे, कीर्तने, प्रवचने, पोवाड्यातून समाजप्रबोधनाचा वसा गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारला. हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सवाने सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचे स्वरूप घेतले. सव्वाशे वर्षं झालेल्या या गणेशोत्सवात आजही ही परंपरा जपली आहे. 

दशकानुसार पुण्याच्या गणेशोत्सवाने धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्थित्यंतरेही अनुभवली. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकविध समाजधुरिणांनी व्याख्यानांतून समाजप्रबोधन केले. हिंदूस्थानच्या क्रांतीकारी आणि सांस्कृतिक चळवळीला या गणेशोत्सवाने दिशा दिली. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची वैचारिक ऊर्जा दिली. विचारही दिले. कालांतराने उत्सवाला लोकचळवळीचे स्वरुप आले. समाज जागृती हाच मुख्य उद्देश या उत्सवामागचा होता. वैचारिक प्रगल्भतेचे व्यासपीठ म्हणूनच खरंतर गणेशोत्सवाची ओळख पुण्याने राष्ट्राला करून दिली. 

हिंदू असो की मुसलमान की अन्य धर्मीय नागरिक अनेकांनी गणपतीसमोर आपली वैचारिक सेवा रुजवल्याची नोंद आहे. अनेक क्रांतिकारक विचारांना या उत्सवाने जन्म दिला. त्यातूनच अनेकांना स्फूर्ती मिळून ते स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले. 

सरदार खासगीवाले, घोटवडेकर, वैद्य भाऊसाहेब रंगारी, लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक सभांतून स्वातंत्र्याचा विचार जनतेच्या मनात रुजविला. या उत्सवाचा मूळ उद्देशच मुळी वैचारिक अधिष्ठानावर आधारित होता. या उत्सवाला ज्ञानसत्राचे स्वरूप देण्यात लोकमान्यांचा वाटा मोलाचा होता. गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत पुण्यात अनेक विषयांवर अभ्यासू, जाणकार व्यक्तींची व्याख्याने होत. त्यामध्ये प्रामुख्याने लोकमान्यांसहीत, न. चिं. केळकर, सी. के. दामले, गणेश व्यंकटेश जोशी, धर्मांनंद कोसंबी, विष्णू गोविंद विजापूरकर, काशीनाथशास्त्री लेले, शि. म. परांजपे, दादासाहेब करंदीकर, नारायण कृष्ण आगाशे. भा. ब. भोपटकर, ज. स. करंदीकर, शंकर रामचंद्र दाते, दत्तोपंत पोतदार अशा अनेक समाजधुरिणांनी सभा गाजविल्या. 

चर्चासत्र, व्याख्यानांची जागा पुढे नाटक, बतावणी, पथनाट्याने घेतली. मानाचा पाचवा केसरीवाड्याच्या गणपती समोर अनेकांचे विचार ऐकायला मिळाल्याचे पुणेकर अभिमानाने सांगतात. अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीची सांगताही जाहीर व्याख्यानांनी होत असे. 

यंदाचे वर्ष पुण्यनगरीचा गणेशोत्सव शतकोत्तर रौप्य महोत्सवी म्हणून साजरा होणार आहे. काळ बदलला, परंतु आजही समाजप्रबोधनाचा वसा गणेश मंडळांनी कायमचा जपला आहे. चर्चासत्रे, मेळे, कीर्तन, प्रवचनांची जागा आता देखाव्यांनी घेतली आहे. देखाव्यांतून ज्वलंत विषयांवर प्रामुख्याने प्रकाश टाकण्याचे कर्तव्यही मंडळांचे कार्यकर्ते इमाने इतबारे पार पाडत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com