गणेशोत्सवातून जोडूया मने 

File Photo
File Photo

गणेशोत्सवाची सुरवात लोकमान्यांनी केली की भाऊसाहेब रंगारी यांनी याबाबतच्या वादाने समाजात भेद माजायला नकोत. गणेश देवतेला पुण्यातील समाजधुरीणांनी रस्त्यावर आणून त्याचे पूजन बहुजनांना खुले केले ते स्वराज्य मिळविण्यासाठी. त्याच गणेशाच्या सार्वजनिक पूजनाची गरज आता भासते आहे ती तडे जात असलेल्या समाजाला पुन्हा सांधण्यासाठी... शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचाल करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवापुढचे हे आव्हान आहे. 

ब्रिटिशांविरोधात आपण एक झालो तर काय करू शकतो, याचा साक्षात्कार समाजपुरुषाला होण्यासाठी गणेशोत्सव, शिवजयंतीचा वापर करता येईल, अशी कल्पना त्या वेळच्या द्रष्ट्या समाजधुरीणांना सुचली. सरदार खासगीवाले यांनी ग्वाल्हेरच्या राजदरबारातील गणेशोत्सव पाहिल्यानंतर तसाच उत्सव पुण्यात होण्याच्या विचाराने समाजधुरीणांची बैठक झाली ती भाऊसाहेब जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी यांच्या घरी. सार्वजनिक उत्सव साजरा करण्याचा आणि लोकांना एकत्र आणण्याचा निश्‍चय या बैठकीत झाला. पहिल्या वर्षी रंगारी, खासगीवाले आणि गणपतराव घोटवडेकर यांनी गणपती बसवले. या समाजधुरीणांचे उद्दिष्ट होते समाज एकत्र करणे. लोकमान्य हे पहिल्या बैठकीला उपस्थित नव्हते, तरी उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची सुस्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. "राष्ट्राच्या अभ्युदयाकरिता असे उत्सव असणे जरुरी आहे... कोणत्याही लोकांत ऐक्‍याची वृद्धी होण्यास अनेक साधने असतात. एक उपास्यदैवत असणे हे त्यापैकीच एक कारण आहे... मेळेवाल्यांनी प्रत्येक पदांत काही तरी सार्वजनिक हिताहिताचा उल्लेख केलेला होता. गणेशोत्सवास राष्ट्रीय स्वरूप यावे अशी "केसरी'कारांची उत्कट इच्छा आहे...' (अग्रलेख - 3 सप्टेंबर 1895 आणि 22 सप्टेंबर 1896) 

गणेशोत्सव सार्वजनिक करण्याचा निर्णय एकमताचा होता आणि त्या असामान्य उंचीच्या दिग्गजांमध्ये उत्सव सुरू करण्याचे श्रेय घेण्यावरून कसलीच स्पर्धा नव्हती. त्यांना वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नव्हती. ते सर्व जण जात-पात-धर्म न पाहता तसेच श्रेयाचा विचारही मनात न आणता एकदिलाने उत्सव करीत होते. त्यामुळेच पहिल्याच वर्षी खासगीवाले गणपतीसमोर प्रा. जिनसीवाले यांचे व्याख्यान टिळकांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. तसेच आपल्यानंतर आपल्या ट्रस्टचे विश्‍वस्त नेमताना रंगारी यांनी पहिले नाव घेतले ते होते लोकमान्यांचे...!

आणि दुसरीकडे लोकमान्यांनीही भाऊसाहेब रंगारी आणि इतर समाजधुरीणांचे 26 नोव्हेंबर 1893 च्या "केसरी'त जाहीर आभार मानले होते. "यंदा येथे गणपती पोचविण्याचा समारंभ सालाबादपेक्षा निराळ्या तऱ्हेने होऊन त्यास बरेच सार्वजनिक स्वरूप आले आहे... करिता यंदाच्या वर्षी ज्या गृहस्थांनी खटपट केली त्यांचे लोकांनी आभार मानिले पाहिजेत,' अशी लोकमान्यांची वाक्‍ये भाऊसाहेब रंगारी आणि इतर पुढाकार घेणाऱ्यांसाठीचीच आहेत, हे निःसंशय. 

रंगारी यांनी राक्षसाशी युद्ध करणाऱ्या स्वतः केलेल्या गणेशमूर्तीतील राक्षस म्हणजे ब्रिटिश सत्ता होती आणि त्या स्फूर्तिदायी मूर्तीमुळे ब्रिटिशांविरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा युवकांना मिळू लागली. क्रांतिकारकांना रंगारींनी शस्त्रास्त्रे पुरवली, तसेच नामवंतांच्या व्याख्यानांद्वारे ब्रिटिश सत्ता उलथवून टाकण्याची मोहीम राबविण्याचे मोलाचे कामही त्यांनी केले, तर उत्सवाला व्यापक स्वरूप देऊन जनआंदोलनाकरिता त्याचा वापर करण्याचे राष्ट्रीय काम लोकमान्यांनी पार पाडले. 

उत्सवातील मंडळांचा सहभाग एक-दोन वर्षांतच भरपूर वाढला. तीन गणपतींच्या उत्सवानंतर पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळ, पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्‍वरी, अखिल नवी पेठ-हत्ती गणपती, शनिपार मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ यांनी उत्सव सुरू केला. स्वराज्यासाठी मेळ्यांचा वापर सुरू झाला. लोकमान्यांनी 20 सप्टेंबर 1907 च्या गणेश विसर्जनप्रसंगी नदीकाठावरील समारोपात म्हटले होते, ""गणपती-विसर्जनानंतर घरी गेल्यावर तुम्हाला ओकेओके वाटेल, ज्या गोष्टीची सवय होते ती नाहीशी झाल्याने मनाला चटका लागणे साहजिक आहे. हजारो वर्षे जी गोष्ट तुम्ही भोगलीत ती गोष्ट - म्हणजे स्वराज्य - गेल्यावर तुमच्या मनाला किती चटका लागला पाहिजे याचा विचार करा... गणपतीची आरती करताना स्वराज्यं, वैराज्यं, पारमेष्ठ्यं हे मागण्याची आपली पूर्वापारची चाल आहे. तुम्ही या शब्दांचा 

अर्थ विसरून गेला होता... स्वराज्याची प्राप्ती व्हावी, असे आम्ही इच्छावयाचे आहे. विशेष वैभवाने, उत्साहाने, स्वातंत्र्याने गणेशोत्सव करता यावा, असे इच्छावयाचे आहे... विसर्जनानंतर स्वदेशी व बहिष्कार ही वाळू येथून नेऊन तुम्ही आपापल्या घरात पसरावी...'' 

वेगवेगळी पदे सुस्वर स्वरात गाणाऱ्या मेळ्यांपाठोपाठ अभिजात, शास्त्रीय संगीतानेही पुणेकरांची मने रिझू लागली होती. अनेक ख्यातनाम कलावंत आपली कला गणेशोत्सवात सादर करण्यासाठी येऊ लागले. गणेशोत्सवाच्या आराशीत काळानुसार बदल झाले. सुरवातीच्या काळात काचेच्या हंड्या आणि बेल्जियमचे आरसे यांची आरास प्रामुख्याने होती. काळानुसार त्यात बदल झाले. धार्मिक-पौराणिक देखाव्यांनंतर सामाजिक विषयही येऊ लागले. 

कालांतराने उत्सवात काही हिणकस बाबी शिरल्या. सांघिकरीत्या होणारी कामे मागे पडली. पूर्वी यातून कार्यकर्ते तयार होत. मात्र आता कंत्राटी पद्धतीचे देखावे येऊ लागले. कार्यकर्त्यांचा थेट सहभाग कमी झाला. 

विद्युतरोषणाईचा नंतर अतिरेक होऊ लागला. ध्वनिवर्धकांच्या भिंतींमुळे कानठळ्या बसू लागल्या. नागरिकांनी न्यायालयात दाद मागितल्यावर "ध्वनिवर्धक वापरताना काटेकोर निर्बंध पाळावेत', असा आदेश उच्च न्यायालयाने 1996 मध्ये दिला. त्यानंतर उत्सवात रात्री दहानंतर ध्वनिवर्धकांना बंदीचा आदेश न्यायालयाने दिला. रात्री बारापर्यंत परवानगी द्यावी, ही राज्य सरकारची मागणी न्यायालयाने 2 सप्टेंबर 2005 ला फेटाळली. त्याची प्रतिक्रिया उमटून त्या वर्षी मिरवणुकीत जाळपोळ, दगडफेक झाली. पुढे विसर्जन मिरवणुकीसह काही दिवस बारापर्यंतची परवानगी सरकार आपल्या अधिकारात देऊ लागले. उत्सवातील गर्दीने फुलून जाणाऱ्या रात्रींची संख्या उत्सवातील आवाज रात्री दहापर्यंतच ठेवण्याच्या निर्णयाने कमी झाली. 

मिरवणूक फारच जास्त वेळ घेऊ लागली. चार तासांपासून ते 33.5 तासांपर्यंतचा वेळ वेगवेगळ्या वर्षी या मिरवणुकीला लागला. त्यामुळे दुसरा दिवस उजाडल्यानंतरही मिरवणूक सुरू राहते आणि अनेक मंडळांची रोषणाई वाया जाते. मिरवणुकीच्या मार्गांत वाढ करण्याचा उपाय योजण्यात आला, मात्र त्याचा परिणाम झालेला नाही. 

विसर्जन मिरवणुकीमधील अचकट-विचकट नृत्य करणाऱ्यांची जागा जोशपूर्ण ढोलवादन घेते आहे, मात्र वादकांची संख्या मर्यादित ठेवण्याची गरज व्यक्त होते. अर्थात ती पाळली गेल्यास सर्वांनाच ढोल-ताशांसारख्या रणवाद्यांचा आनंद लुटता येईल, तरुण पिढी एका चांगल्या कलेकडे ओढली जाईल. 

मातीच्या गणेशमूर्तींची पर्यावरणपूरक परंपरा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे गेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून भंग पावली असून प्रदूषण वाढते आहे. त्यामुळे पुन्हा शाडू मातीच्या मूर्तींचा आग्रह धरला पाहिजे. 

सर्वांत महत्त्वाचा मुद्दा समाज सांधण्याचा. उत्सवाची सुरवातच समाज एक करण्याच्या हेतूने झाली. पण आता त्याच उत्सवाच्या निमित्ताने समाजांत दुही पसरवण्याचे प्रयत्न होत असतील तर ते खेदजनकच. 19 व्या शतकाच्या अखेरीचा काळ सनातन्यांच्या प्राबल्याचा होता. काही कथित उच्च जाती वगळता अन्य समाजाला स्वातंत्र्य-पारतंत्र्यातला फरक अनुभवाला आलेला नव्हता. अशा शोषितांसह सर्व समाजाला ब्रिटिशांविरोधात उभे करणे हे महाकठीण काम करण्यात टिळक-रंगारी-खासगीवाले आदींना यश आले. हे लक्षात घेतले तर टिळकांच्या पुढील ओळींचा अर्थ समजतो. ""गणपती देवता आजपर्यंत पांढरपेशे वगैरे लोकांमध्ये असून त्या देवतेसंबंधाने घरोघरी उत्सव, मंत्रपुष्प, जाग्रणे, कीर्तने वगैरे थाटाने होत असत हे खरे आहे, तथापि यंदा आम्हा मराठ्यांचा आधारस्तंभ जो वैश्‍यवर्ग अगर प्रत्यही निढळाच्या घामाने पैसे मिळवून आम्हा सर्वांची तोंडे उजळ करणारा साळी, माळी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, वाणी, उदमी इत्यादी औद्योगिक वर्ग यांतील लोकांना यंदा विलक्षण रीतीचे सार्वजनिक स्फुरण येऊन त्यांनी हा दिवस साजरा करण्यासाठी जी काही मेहनत घेतली ती केवळ अपूर्व आहे... साळी, माळी, सुतार, रंगारी, ब्राह्मण, व्यापारी, मारवाडी, चांभार या जातींनी क्षणभर आपआपला जातिमत्सर सोडून देऊन परस्परांशी एका दिलाने व एका धर्माभिमानाने मिसळले- खेद करण्याकरती ती काय गोष्ट झाली ?... हिंदू धर्माची नालस्ती करणाऱ्या ब्राह्मणविद्वेषी लोकांनी मराठे आणि ब्राह्मण यांच्यामध्ये फूट पाडून सर्व हिंदू समाजाचे अकल्याण करण्याच्या प्रयत्नास सुरवात केली आहे. याकरिता आपण सर्वत्रांनी या वेळी सावध असले पाहिजे... ब्राह्मण-मराठे यांचा एकोपा हल्लीच्या सज्ञान काळात वृद्धिंगतही होत गेला पाहिजे...'' (18 सप्टेंबर 1894). अर्थात, टिळकांना "मराठे' या वर्गात मराठा, बलुतेदार- इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी एवढे बहुजन अपेक्षित असल्याचे दिसते. तरीही त्या काळच्या सामाजिक स्थितीत ते ऐक्‍यही महत्त्वाचे होते. 

हेच ऐक्‍य उत्सवाच्या सव्वाशे वर्षांनंतरच्या वाटचालीत पुन्हा प्रत्ययाला यावे. पुन्हा धर्मीय, वर्गीय, जातीय भावना डोके वर काढू लागल्याचे दिसतेय. सकस वाद खेळण्याची, मुद्द्याला मुद्द्याने उत्तर देण्याची परंपरा महाराष्ट्राने गेल्या दीडशे वर्षांत निर्माण करून जपली. दुर्दैवाने समाज पुन्हा जाती-पातीच्या कुंपणाआड जात चालला आह. दुसऱ्याचा विरोधी विचार विचाराने नव्हे तर बळाने आणि सांस्कृतिक दहशतीने दाबण्यात येतो आहे. 

... त्यामुळेच सार्वजनिक गणेशोत्सवाची गरज पारतंत्र्यापेक्षा 2017 मध्ये जाणवू लागली आहे. म्हणूनच सर्व जाती-धर्म-पंथाच्या व्यक्तींना सुज्ञ नागरिकांनी गणेशाच्या मांडवात एकत्र आणून त्यांचे खऱ्या अर्थाने मनोमीलन झाले, तरच "महाराष्ट्र अन्‌ मानव धर्म राहिला काही तुमचे कारणे...' असे पुढच्या पिढ्या म्हणतील. संपूर्ण उत्सवावर प्रभाव पाडू शकणारे आधुनिक टिळक-रंगारी आज नसले तरी पुढच्या पिढीने एकदिलाने प्रयत्न केल्यास ती उणीव जाणवणार नाही, एवढे निश्‍चित. 

सुनील माळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com