Ganesh Festival : ढोल-ताशा पोहोचला साता-समुद्रापार

Ganesh Festival : ढोल-ताशा पोहोचला साता-समुद्रापार

सध्या ढोल-ताशावर टीका होते, ती आवाजामुळे आणि पथकांच्या वाढत्या संख्येमुळे. ध्वनिप्रदूषण आणि डेसिबल हे शब्द उत्सवाच्या काळात हमखास चर्चेत येतात. तरुणांनी काय करावे, हे सांगणारे टीकाकार समाजात खूप आहेत. पण, तरुणांनी काय करावे, याचे मार्गदर्शन अनेक ढोल-ताशा पथकांमधून होते, याची या मंडळींना कदाचित जाणीव नसावी. वादनासाठी एकत्र येणे नव्हे, तर एकत्र येण्यासाठी वादन ही कल्पना अनेक पथके राबवत आहेत. त्यांच्यातल्या चांगल्या गुणांसाठी या पथकातल्या तरुणांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडायलाच हवी. त्याचबरोबर त्यांच्यातील उत्साह उन्मादात बदलू नये म्हणून त्यांच्यात सहभागी होऊन काम करायला हवे. प्रवाहाच्या काठावर उभे राहून पोहायला शिकवण्यापेक्षा या प्रवाहात उतरून हात मारायला शिकवले, तर ही चळवळ अधिक विधायकतेकडे जाईल. वादन करणारे हे हजारो हात राष्ट्रकार्यासाठी उपयोगी पडू शकतात. आज ढोल-ताशा चळवळ ही संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. ढोल-ताशा महासंघाचे कार्य मुंबईपासून नागपूरपर्यंत पसरले आहे. सुरत-अहमदाबाद येथील पथकेही ढोल-ताशा महासंघाच्या संपर्कात आहेत. एवढेच नव्हे, तर ढोल-ताशा आणि पर्यायाने महाराष्ट्राची कीर्ती अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, दुबई येथेही अनेक पथके ढोल-ताशाचे वादन करीत आहेत. जुलै २०१९ मध्ये नॉर्थ अमेरिकेत महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने पहिली विदेशी ढोल-ताशा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. त्यात अमेरिकेतील पंधरा पथके सहभागी होत आहेत. ढोल-ताशा हा इथल्या तरुणाईचा परवलीचा शब्द बनला आहे. अजय-अतुलसारख्या संगीतकारांनाही ढोल-ताशाचा वापर चित्रपट संगीतात करावासा वाटावा, यात नवल ते काय? ढोल-ताशा वादनाची संस्कृती सर्वदूर पसरत असताना महाराष्ट्रातील मराठी माणसाला याचा गर्व नाही, पण अभिमान निश्‍चित वाटेल. वादक हे केवळ वादक न राहता साधक बनल्याने त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. वाढत्या जबाबदारीचे ओझे न बाळगता नाद-लय-सूर-तालाने संपन्न अशा ढोल-ताशा वादनाला या गणेशोत्सवाच्या निमित्ताने खूप-खूप शुभेच्छा! उद्या गणेशाचे विसर्जन. ढोल-ताशा पथके आपल्या तयारीत गर्क आहेत. कुणी गणवेशांना इस्त्री करून आणतोय, तर कुणी पथकाच्या सरावाच्या ठिकाणी जाऊन ढोलांची पाने ताणतोय. उद्या मन लावून हे साधक कलाकार आपली कला गणेशासमोर आणि पुणेकरांसमोर सादर करतील. त्यांच्याबरोबरच आपणही ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या देवतेला निरोप देताना म्हणूयात पुनरागमनायच!- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com