चवथ : चाकरमान्यांचो सण..!

ganesh festival
ganesh festival

प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात एक छोटासा सुबक देव्हारा असतो. त्याला तोरण असते प्रेमाचे. त्यामध्ये श्रद्धा व भक्तीच्या समया निरंतर तेवत असतात. गणरायाच्या आगमनामुळे केवळ मानवच नव्हे, तरसकलचराचर सृष्टीलाआनंदाचेनुसतेभरतेयेते.उत्सवप्रियव मोठी सांस्कृतिकपरंपरा असलेल्याकोकणातहीयापेक्षावेगळेचित्रदिसणार नाही.तरी कोकणाचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे सार्वजनिक गणपतीपेक्षा कोकणात घरगुती गणपती अधिक अगत्याचा असतो. यानिमित्ताने मठीमठीचे मंदिर बनते. आकर्षक मखरे, सजावट, मोदकांची रेलचेल, विद्युत तोरणांची रोषणाई असा थाटमाट सगळीकडे दिसत असतो. सार्वजनिक गणपतींसारखेच हालते देखावे काही जण घरांतल्या गणपतींसमोर करतात. गणरायाच्या सेवेत भाविक कसलीही कसर ठेवत नाही. गोडधोड पदार्थ करण्याबरोबरच घरातील बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष ठेवणारा महिला वर्ग फावल्या वेळेत इतरांच्या गणपतींचेहीदर्शनघेत असतो.

"चवथ' या एका शब्दांनेच मालवणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह भरभरून वाहायला लागतो. चवथ हा शब्द मालवणी व कोकणी किनार घेऊन आलेला आहे खरा, पण मराठीला अपरिचित नक्कीच नाही. "चंद्र चवथीचा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला" गाताना चवथ भेटलेला असतो. मालवणी मुलखात चवथ म्हणजे गणेश चतुर्थीच. इतर चवथी "संकस्टी" किंवा "इनाय्की" असतात.
इतर ठिकाणी गणरायाच्या आगमनाबरोबर सुरू होणारा हा सण कोकणी माणसाच्या मनात पावसाळ्याबरोबरच सुरू होतो. आपल्या घरात यंदा येणारी गणपतीची मूर्ती कशी असावी यावर खल केला जातो. उत्तम चित्रं असलेले कॅलेंडर अगदी जपून ठेवलेले असते आणि या वेळी गणपतीच्या शाळेत अशी हुबेहूब मूर्ती बनवायला सांगायची असा गुप्त बेत घरची मंडळी आखतात. या आराध्य दैवताचा कोकणातला रुबाबच काही और असतो. आता कोकणी माणूस पूर्वीसारखा चाकरमान्यावर अवलंबून नसला तरी फार पूर्वीपासून चाकरमानी आणि गावचा त्याचा परिवार गणपतीसाठी काय वाट्टेल ते, अशाच मन:स्थितीत असायचा.
मालवणी मुलुखातील गणपतीची शाळा हे खास प्रकरण आहे. मूर्तीकाराने व्हाळाकाठची चिकणमाती कधीचीच आणून ठेवलेली असते. त्या मातीत बारीकसाही खडा राहू नये, मूर्ती घडवेपर्यंत मातीत घट्टपणा येऊ नये याची काळजी तो घेत असतो. या गणपतीच्या शाळेत घराघरांतून नागपंचमीपर्यंत गणपतीची मूर्ती ठेवायचे पाट पोहोचलेले असतात. त्यावर शाडूच्या मातीला आकार येऊ लागतो. कारागिराचे कसलेले हात लीलया फिरू लागतात आणि शाळेत एक एक मूर्ती अवतरायला लागते. या मूर्तींचे आविर्भाव अनेक. त्यांच्या घडणीच्या तऱ्हा अनेक. गणपतीच्या मूर्ती बनवण्याची ही निर्मिती प्रक्रिया न्याहाळण्यासाठी शाळकरी मुलांची गर्दी वाढत असते. नागपंचमीच्या आधी या मातीत खेळत नाग तयार करण्याची, ते रंगवण्याची संधी या मुलांना मिळते. नंतरही गणपतीबरोबरचा उंदीर तयार करायला मिळतो. आपण सांगितली तशीच मूर्ती घडतेय ना, हे पाहण्यासाठी मोठ्यांचीही अधूनमधून फेरी होते. शाडूचा मूर्तीवर शेड आणि मग होणारे रंगकाम इतक्‍या सफाईने केले जाते की त्या मनोहारी मूर्तीसमोरून पायच निघत नाही. या रंगांचा दिमाखही न्याराच असतो. दिनाकाका काही मोजक्‍याच मूर्ती बनवायचे. त्यांना आयटीतून (साच्यातून) मूर्ती काढणे आवडायचे नाही. ते आपल्या हातांनी मूर्ती घडवायचे. त्या मूर्तीचा प्रत्येक अवयव, अगदी रेघन्‌ रेघ कुठल्या तरी तंद्रीत साकार व्हायची. जणू हिरेमाणके जडवलेला अस्सल सोन्याचा मुकूट दिनाकाका गणरायांच्या मस्तकी ठेवायचे. पितांबर असो की शेला तोही खराखरा वाटायचा. महिना दीड महिना मी या मूर्ती पाहात असे, पण चवथीच्या आदल्या दिवशी मी जागा व्हायचो तेव्हा गणपतीच्या शाळेतल्या सगळ्या मूर्ती त्यांचे मातीपण विसरून जिवंत होऊन बसलेल्या दिसायच्या. मूर्तींचे डोळे जिवंत असायचे. त्या मूर्तींसमोर उभे राहिले की वाटायचे, देवाला खरेच डोळे असतात!

एकीकडे गणेशमूर्ती शाळेत आकार घेत असताना प्रत्येक वाडीतील भजनीमंडळीही टाळ, मृदुंग, तबला, पेटी, पखवाज हा सर्व साज जागच्या जागी आहेत की नाही, हे पाहतानाच भजनांच्या तालमींनाही जोर आलेला असतो. श्रीकृष्ण जन्माष्टमींचा ज्या घरी मांड असतो, त्या घरी पहिलं भजन केलं जातं आणि मग मंदिरात किंवा वाडीतील प्रमुखाच्या घरी दररोज या भजनाचा नाद घुमत असतो. अशाच या भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा आदला दिवसही येतो. याला आवारणे म्हणतात. आवारणे म्हणजे गणेशाच्या आगमनापूर्वी घर आणि परिसर स्वच्छ करणे. पूर्वी भिंती लाल मातीच्या कावेने व जमीन शेणाने सारवली जायची. आता ऑइलपेंटचा काळ आहे. परंतु घरावर रंगरंगोटीही अशीच असते. त्या कावेच्या रंगरंगोटीतही वेगळीच कलाकृती दडलेली असते. आदल्या दिवशी मूर्ती घरी आणून ठेवली जाते. त्याचवेळी श्रीगणेश आसनस्थ होणा-या जागी मागील भिंतीवर सुंदर वेलबुटी रेखाटलेली असते. कुणी मानग्याचा (बांबूचा) कंपास करून वर्तुळात फूल रेखाटलेलं असतं. घरातला किंवा कुणी शेजारी ज्याला ब्रश नीट हाताळता येतो, असाच गावातील चित्रकार रेखाटत असतो. गाववाल्यांनाही गणपतीच्या पाठीमागे चित्र कुणाचे अधिक चांगले झाले याचे एवढे अप्रुप असते की, त्याची चर्चा अशीच एखाद्याच्या घराच्या ओटयावर बसून गुळपिठाच्या करंजीसोबत रंगत असते. आवारण्याची गडबड सुरू असतानाच भटाबामणांच्या घरात हरितालिका येते. मातीच्या दोन स्त्रीमूर्ती असतात. बसलेल्या. त्यातील एक पार्वती. हातात शिवलिंग घेतलेली. दुसरी तिची सखी. या हरितालिकांचे विसर्जन झाल्याखेरीज गणपती बसवला जात नाही.

श्रीगणेशमूर्तीच्या वरती माटवी (माटी किंवा माटोळी असेही नाव आहे.) सजवण्याचाही एक वेगळाच आनंद असतो. मानग्यांच्या भेतांपासून (कामट्यांपासून) बुद्धिबळाच्या चौकटीसारखी ही माटवी तयार केलेली असते. निसर्गातल्या फलाफुळांनी नटलेली ही माटोळी गणेशमंचाला अधिकच आकर्षक करते. या माटीला नारळ, सुपारीपासून रानात मिळणाऱ्या शेरवडं, हरणं, कांगलां, कवंडाळ, कोकणे, वाघाचे पंजे अशा सुमारे सत्तर-पंचाहत्तर रानवनस्पती व रानफळांनी सुशोभित केले जाते. बहुतेकजण जंगलात जाऊन स्वतः या फळांचे झुबके आणतात. कोणीही सगळी रानफळे, रानफुले तोडत नाहीत. इतरांसाठी झाडावरच काही राखून ठेवतात. आता मखराच्या कलाकुसरीचे काम करण्यात येते. काही जणांकडे कायमचे लाकडी मखर असते. तेच शृंगारायचे असते. पण बहुतेकांकडे तात्पुरते मखर असते. काही घरात पंचमीला आवर्जून केळीच्या गभ्यांचे मखर केले जाते. किमान चार गभे लावले जातात. गणपतीला विराजमान होण्यासाठी चौरंगाची जागा, दारातून थेट दर्शन होईल अशी निवडली जाते.

सगळी धांदल उडालेली असते आणि नुकतेच लग्न होऊन गेलेल्या मुलीच्या सासरी चवथीचे वजे पाठवण्याची घाई असते. माटवीला बांधायची फळफळावळ, खोबऱ्याच्या सारणाच्या करंज्या, तळणीचे मोदक
एका मोठ्या टोपलीतून मुलीच्या सासरी पाठवले जातात. हेच ते वजे. त्याचे ओझे ती टोपली वाहणाऱ्यापेक्षा ते वजे पाठवणाऱ्या मुलीच्या वडिलांनाच अधिक असते. या निमित्ताने तीस-चाळीस हजार रुपये खर्च झालेले असतात. सासरची माणसे या वज्यातील पदार्थ पाच घरी पाठवतात. वजे घेऊन येणाऱ्याचा धन-वस्त्र देऊन सासरकडून आदर केला जातो.

आवारणे झाल्यावर घरातले लहानमोठे शेतीच्या बांधावरून लगबगीने गणपतीच्या शाळेकडे निघालेले असतात. नारळ आणि बोलीचे पैसे मूर्तीकाराच्या हातावर ठेवून मूर्ती उचलली जाते. शाळेबाहेर अंगणात तुळशीसमोर अगरबत्ती लावून झपझप पावले टाकत तरणागडी गणपती घेऊन वाडीकडे निघतो. मुले झांजा-टाळ वाजवत असतात. कधी कधी एखादा दुसरा ढोल-ताशाही असतो. घराच्या अंगणात येताच मूर्ती ज्याच्या डोक्‍यावर असते, त्याच्या पायावर पाणी ओतून मूर्तीला आत घेतले जाते. सुतळी बॉम्बचा बार उडवला जातो. तुळशीजवळ उदबत्तीचा सुगंध दरवळायला लागतो. तिथेच अंगणात शेजारचा माणूस त्या मूर्ती आणणाऱ्याला आपल्या गणपतीची मूर्ती आणण्यासाठी आपल्याबरोबर न्यायला आलेला असतो. सगळ्या आवाठातल्या (वाडीतल्या) मूर्ती आणण्याचे काम करणाराही तसा कसबीच म्हणायचा, पावसाळ्यात निसरडया वाटेवरून मूर्ती आणणे हे फार जोखमीचे काम असते.

घरोघरी गणपतीच्या मूर्ती आलेल्या असतात. मुलाबाळांचा जल्लोष सुरू असतो. उद्यापासून "भजनाक जावक व्हया' म्हणून काही लोक पेटी, तबला, मृदुंग, टाळ, झांज यांची जुळवाजुळव करीत असतात. बहुतेकांकडे दीड दिवसाचा गणपती असतो. त्यामुळे चवथीच्या दिवशी रात्री आवाठातल्या सगळ्यांकडे भजन असणार. संध्याकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत भजने करीत मंडळी फिरणार. दीड दिवसांच्या गणपतींपुढे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आरती. जे गणपती राहणार असतील, त्यांच्याकडे पुढे एकदा भजन रंगणार असते. म्हणून यावर्षी कुणाकडे किती दिवस गणपती राहाणार याचा अंदाज देवळात जमलेली मंडळी घेत असतात. त्याप्रमाणे रोज करण्याच्या भजनांचे आणि आरतीचे नियोजन त्यांना करायचे असते. इथे पेटी वाजवणारा आणि ती उचलून घरोघरी नेणारा यांची विशेष खबर काढली जाते. तो पूर्ण दिवसांसाठी उपलब्ध आहे ना याची खातरजमा केली जाते. तबल्यावरची शाई या वर्षीही तशीच उडालेली आहे म्हणून कटाक्ष टाकले जातात. "जावदे, पुढच्या वर्षांक काय तरी व्हयाच, नाय?,' असे म्हणून तो विषय संपवण्यात येतो. शेवटी आवाठातल्या घरांचा क्रम ठरतो, वेळेवर हजर राहण्याची तंबी दिली जाते. सकाळी भटजी येळेर इले म्हंजे पुरे म्हणत त्या बैठकीची सांगता होते.

भल्या पहाटे उठून आंघोळ करून फुले, तुळशी, दुर्वा काढल्या जातात. सगळीकडे अमाप उत्साहाचे वातावरण असते. गणपतीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठापना केली जाते. पूजा आटोपल्यावर सजावटीकडे विशेष लक्ष पुरवले जाते. उकडीच्या मोदकांचा आणि सुग्रास भोजनाचा दरवळ सगळ्याच घराघरांतून येत असतो. नंतर घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी तळणीचे मोदक करून ठेवलेले असतात. ज्याने नवे घर बांधलेले असते, त्याने स्वतःहून गणेशमूर्ती आणून पुजायची नसते. शेजारी तयारच असतात. भल्या पहाटेच कुणीतरी मूर्ती आणून दारात ठेवतो आणि फटाक्‍यांचा सर पेटवून निघून जातो.

घरवाले लगबगीने दार उघडतात, तर गणराय घराकडे तोंड करून घरात घेण्याची वाट पाहात बसलेले असतात. मग आसपासचेही येतात. कुणी माटवी तयार करूनच ठेवलेली असते. कुणी पूजेसाठी फुले-दूर्वा आणते. शेजारचा किराणावाला पूजेचे साहित्य पाठवतो. नव्या घरात गणराय आलेले असतात. त्या दिवशी त्या नव्या गणपतीपुढची आरती अधिक रंगते.

अख्खें कोकण खऱ्या अर्थाने हा सण साजरा करीत असते. महाराष्ट्रात इतरत्र दिवाळीत होणारी फटाक्‍यांची आतषबाजी कोकणात मात्र गणेश चतुर्थीलाच होते. त्या अर्थाने इथे चतुर्थीतच दिवाळी साजरी केली जाते. घरोघरी गणरायाला षोडशोपचारे पुजले जाते. विजेच्या तोरणांची आरास मांडली जाते. सत्यनारायणाची महापूजा केली जाते. पाहुणे, मित्र-मंडळी यांची सतत ये-जा सुरू असते. याच दिवसांत करंज्या, मोदक, पंचखाद्य, लाडू असे फराळाचे पदार्थ घरी बनवले जातात. अगदी सगळ्या घरात हमखास गोडाधोडाचे पदार्थ बनवण्याचे वर्षांतले हेच दिवस असतात. भजनाला येणाऱ्यां मंडळींसाठी खास काळ्या वाटाण्याच्या उसळीचा बेत आखला जातो. भजनानंतर प्रत्येकाला द्रोणभर उसळ आणि चहा दिला जातो.

उत्सवातील उत्साहात महिला मागे नसतात. काही घरात तृतियेलाच गवर आलेली असते. बहुतेकांकडे चवथीलाच गणपतीबरोबर गवर येते. कवाथ्याला (नारळाचं छोटे झाड) गौरीचे चित्र बांधून पूजा केली जाते. कवाथा नसेल तर हळदीचा खांब असतो. हरणे, तेरडा आणि कसकसल्या रानफुलांच्या फांद्या खोचलेल्या असतात. कासाळवत या रानअळवाला स्थान असते. रानअळू मिळाले नाही, तर परसातल्या घरगुती अळवाचाही वापर केला जातो. गवरीचे चित्र असलेल्या कागदावरून काळ्या मण्यांचे मंगळसूत्र बांधलेले असते. ही गवर गणपतीच्या शेजारी बसते. तिच्यापलीकडे म्हादेव. हा म्हादेव म्हणजे असोला नारळ. गवरी विसर्जनाच्या वेळी तिच्या सांगाती सुपात पेटता दिवा ठेवला जातो. (एरवी, सुपात पेटता दिवा ठेवणे हे अशुभ मानले जाते.)

महिलांचा फुगड्यांतील उत्साह पाहण्याजोगा असतो. फेर धरत महिला फुगडी म्हणू लागतात, ती अशी -
"गणपती देवा, करीन तुजी सेवा
नवास करीन रे, नवास करीन
पाच फुलांनी, पाच फळांनी
दूरवा वाहीन रे,
कपाळीचा कुकू दी जलामभर
आणखी काय मागीन रे'
अशी अखंड सौभाग्याची प्रार्थना केली जाते. काही हास्य गीतेही बायका फुगडीतून सादर करतात, जशी -
"गडबड घोटाळो जालो जालो
भायेर पावणो इलो इलो
पावण्याक बसाक दिली शेंदरी दिली शेंदरी
त्येनी केली त्येची बोंदरी तेची बोंदरी"
आणि
"जावेक जाव शिकयता
घोटयेत भाकर लिपयता
ये गे जावे, वाड्यात बसान खावया
वाड्यातली भाकर गोड गे
जावेचो काडलो झोड गे....'

या फुगडीखेळाच्या वेळीच अपत्यप्राप्तीसाठी गणपतीपुढे नवस बोलले जातात. "माटयेक प्वॉर बांदीन" हा नवस फेडण्यासाठी कपड्यात गुंडाळलेले मूल माटवीला बांधले जाते. बुंदीलाडवांचा पेड बांधण्याचाही नवस असतो. मूर्तीभोवती लाडवांचा पार बांधून हा नवस फेडला जातो. देवासमोर नागडी फुगडी घालण्याचा नवस पूर्वी केला जात असे आणि तो दारेखिडक्‍या बंद करून रात्रीच्यावेळी फेडला जात असे. पुरूषांकडून गणेशविसर्जनाच्या आधी नवस बोलले जातात. त्यात प्रामुख्याने पुढच्या वर्षी पाच दिवस, सात दिवस सेवा करण्याची बोली असते. सत्यनारायणाच्या पूजेचा किंवा माटवीला पाच नारळांचे तोरण बांधण्याचा नवसही पुरूष बोलतात.

कोकणात जसे नवे घर झाले की तेथे गणपती बसवला जातो, तसे काही कुटुंबात कितीही घरे वाढली तरी मूळ घरीच गणपती बसवला जातो. मग पन्नास-शंभर कुटुंबांचा मिळून एकच गणपती असतो. ती सारी कुटुंबे मूळ घरी जमून उत्सव साजरा करतात.

हरितालिकेपासून गणपती विसर्जनापर्यंतच्या प्रत्येक दिवसाचे एक वेगळे महत्त्व असते आणि त्या त्या दिवशी ते ते सर्व सोपस्कार अगदी मनोभावे पूर्ण केले जातात. पंचमी दिवशी दीड दिवसाचे गणपती जातात. त्याच दिवशी ऋषिपंचमी साजरी केली जाते. अळू, कंदमुळे आदी पाच भाज्यांची चविष्ट भाजी त्या दिवशी बनवली जाते. उंदरबी असल्याने उंदराला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. उंदरबी दिवशी गणपतीला नैवेद्य दाखवण्याआधी उंदरासाठी शेतात पान वाढले जाते. उंदरांनी भात पिकाचे नुकसान करू नये म्हणून प्रार्थना केली जाते. आम्ही पोरवयात एक गाणे गात असू -
`मुसळासारी सोण तुजी गनेसा, सुपासारे कान
मुडीसाऱ्या प्वॉटाखाली गावली उंदराची मान"
गावातील शेतातून उंदीर अजून आहेत; पण घरातून मुसळे गेली, मुडी गेली आणि हे गाणेही.

अनेक रूढी आणि परंपरा यांचे पालन करण्यात कोकणातला देवभोळा माणूस चुकत नाही. चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये हे माहिती असले तरी चुकून वर नजर गेली आणि चंद्र दृष्टीस पडलाच तर मात्र तो बेचैन होतो. मग कुणाच्या तरी परडयातली भाजी गुपचूप तोडून तो त्या दोषाचं परिमार्जन करू पाहतो.

बहुतेकांकडे दीड दिवस गणपती असले तरी काही जणांकडे तीन, पाच, सात, नऊ दिवसांपर्यंत गणपती असतात. अकराव्या दिवशी किंवा अनंत चतुर्दशी दिवशी सर्वच गणपतींचं विसर्जन होतं. विसर्जनाच्या वेळी आरती केल्यावर गणपतीला गाऱ्हाणे घातले जाते. नवस बोलले जातात. गाऱ्हाणे, ते घालण्याची पद्धत हा खरा तर कोकणातला सांस्कृतिक ठेवाच आहे. एवढे सगळे झाले की, गणपतीच्या हातावर दही ठेवले जाते. एका माणसाने गणपतीची मूर्ती डोक्‍यावर घेऊन जाण्याएवढे त्या मूर्तीचे वजन असते. वाजतगाजत गणपतीची मिरवणूक काढली जाते. फटाक्‍यांची आतषबाजी होते. गावातल्या तलावाजवळ किंवा विहीर, ओढयाजवळ आवाठातले गणपती विसर्जनासाठी एकत्र आणले जातात. अनेक देखण्या गणेश मूर्ती, धूप, अगरबत्तीचा घमघमाट, संधिप्रकाशातला उजेड, निरांजनांचा मूर्ती उजळून टाकणारा प्रकाश आणि भावनांचा कल्लोळ अशा वेगळ्याच वातावरणात पुन्हा एकदा मनोभावे आरती केली जाते. पंचखाद्यं, नारळ, फळे यांनी युक्त असा प्रसाद वाटला जातो. खूप जड अंत:करणाने गणरायाला निरोप दिला जातो. जिवलगाने दूरदेशी निघून जावे तशी माणसे हेलावतात. पण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला म्हणणारा चाकरमानी पुन्हा एकदा गावाला राम राम करून मुंबयकडे वळतो तो वर्षभराची ऊर्जा घेऊनच. गेल्या काही दिवसात सगळ्या आवाठाचे एक मोठ्ठे कुटुंबच एकत्र नांदत असते. मंगलमय सुरांच्या साथीने, मोहक सुगंधात न्हाऊन निघालेली घरे, आवाठ, गाव अपार श्रद्धा आणि आनंदाने ओतप्रोत भरलेली दिसतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com