Ganesh Festival : श्री कसबा पेठ गणपती संस्थानाची परंपरा; मिरवणुकीला सुरवात (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

स्वत: लोकमान्य आणि अण्णासाहेब पटवर्धन यांनी कसबा गणपती हे शहराचे ग्रामदैवत आहे, म्हणून त्याला अग्रक्रम दिला.

पुणे- कसबा गणपतीच्या मिरवणुकीला ढोलताशाच्या गजरात सुरवात झाली असून चांदीच्या पालखीत श्रींची मूर्ती विराजमान झाली आहे. भव्य मिरवणुकीला सुरवात झाली आहे.

छत्रपतीकालीन कसबा गणपती मंदिर हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. 1893 साली पुण्यात जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला त्यावेळी तत्कालीन रे मार्केटमध्ये या मंदिरातही उत्सव सुरू झाला. अ‍ॅड. दंडवते आणि अ‍ॅड. भाऊसाहेब निरगुडकर या सुरवातीच्या अध्यक्षांनी कामात झोकून दिले. 

1994 सालापर्यंत पुण्यात जवळपास शंभर गणपती मंडळांची स्थापना झाली होती. मिरवणुकीदरम्यान कोणाचा गणपती पुढे असावा, याविषयी जरा वाद निर्माण झाला असता स्वत: लोकमान्य आणि अण्णासाहेब पटवर्धन यांनी कसबा गणपती हे शहराचे ग्रामदैवत आहे, म्हणून त्याला अग्रक्रम दिला. तेव्हापासून कसबा गणपती मिरवणुकीच्या अग्रभागी राहून नेतृत्व करत आहे. पुण्यात महिलांसाठी उपक्रम सुरु करणारे हे पहिले मंडळ आहे. सामाजिक कार्यात या मंडळाचा सहभाग असतो. किल्लारी भूकंप झाला होता तेव्हा मंडळाने भूकंपग्रस्तांसाठी तात्काळ मदत दिली होती. गणेशोत्सवादरम्यान अगदी साधी सजावट येथे केलेली असते. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी केवळ मंडळाकडून साखर वाटप केले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shree Kasba Peth Ganapati Trust Pune