सेलिब्रिटींचा गणेशोत्सव

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 September 2018

बाप्पाला फुलांची आरास

बाप्पाला फुलांची आरास
गेली १५ वर्षे आमच्याकडे गणपती येतोय. पाच दिवस जंगी सेलिब्रेशन असतं. सगळे नातेवाईक घरी येतात, त्यांना भेटणं होतं, बोलणं होतं. त्यामुळे बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही जोडले जात असतो. यावर्षी पहिल्यांदाच मी बेसनाची बर्फी घरी बनवली. त्यामुळे माझ्यासाठी हे सगळं खूपच एक्‍सायटिंग होतं. आम्ही दरवर्षी आमच्या बाप्पाला फुलांची आरास करतो. दरवर्षी आमच्याकडे बाप्पाला फुलांनीच सजवले जाते. एका वर्षी माझ्या नवऱ्याने नवस केला होता की, जर आम्हाला होणारी जुळी मुलं एक मुलगा आणि दुसरी मुलगी असेल तर आम्ही ११ दिवसांचा गणपती बसवू आणि त्याचा हा नवस पूर्ण झाला. आम्ही खरंच त्यावर्षी ११ दिवस गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. त्यावर्षी खरंच खूप मजा आली होती. तो गणेशोत्सव मी कधीच विसरू शकत नाही.
(विविध सजावटींबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास, सोनाटा गणेशोत्सव अॅप डाउनलोड करा.)
- अशिता धवन

--------------------------------------------------------------------------------------------------------
साधेपणात सात्विकता

आमच्या पुण्याच्या घरी गेली १० वर्षे आम्ही गणपती आणतो. मी पहिले दोन दिवस आवर्जून घरी थांबते. गणपती सजावटीच्या मोहिमेत मी नसतेच. ते सगळं काम माझा भाऊ आणि माझी मैत्रीण मिळून करतात. आमच्याकडे फार मोठी सजावट किंवा देखावा नसतो. साधी फुलांची आरासच मुख्यतः असते. कारण सगळं खूप नेटकं आणि साधं ठेवण्यावर माझा विश्‍वास आहे. त्यात सगळं इकोफ्रेंडली असलं पाहिजे यावरही माझा भर असतो. फुलांच्या सजावटीव्यतिरिक्‍त निरांजन, अगरबत्ती या सगळ्याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं. मूर्तीही अतिशय साधी, बसलेली, पिंताबर नेसलेली, आशीर्वाद देणारी, चेहऱ्यावर शांत भाव असलेली पारंपरिक अशीच असते. १० दिवस आमच्याकडे प्रसादासाठी दरदिवशी वेगवेगळे पदार्थ बनतात, पण त्यातले उकडीचे मोदक किंवा तळलेले मोदक हे विशेष असतात. आई करंज्या वगैरे करतच असते, पण उकडीचे किंवा तळलेले मोदकच मला आवडतात. जर पाचएक दिवस थांबले, तर पुण्यातील जे पहिले मानाचे पाच सार्वजनिक गणपती आहेत, ते मी पाहायला जाते. आमच्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन तळजाईला मोठमोठे टॅंक उभारले जातात, तिथेच गेली कित्येक वर्षे आम्ही करत आहोत.
(इको फ्रेंडली गणेश वर्कशॉप व वेगळ्या गणपती विशेष पाककृतींसाठी सोनाटा गणेशोत्सव अॅप डाउनलोड करा.)
- प्राजक्ता माळी

--------------------------------------------------------------------------------------------------------
बाप्पासाठी स्पेशल उकडीचे मोदक

आमच्याकडे गेली १८ वर्षे गणपती येत आहेत. गौरी आमच्याकडे मुखवट्याच्या असतात. त्यांना आम्ही साड्या वगैरे घालून सजवितो. गौरींबरोबर गणपतीचं विसर्जनदेखील होतं. मूर्ती ही इकोफ्रेंडलीच असावी हा आमचा आग्रह असतो. आम्ही मुख्यतः कलरफुल गणपती आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे गणपतीकडे पाहून फ्रेश वाटतंच; पण त्या मूर्तीचे रंग पाहूनही फ्रेश वाटतं. आम्ही वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती घेतो. आमचे एक काका ठरलेले आहे. गेली १८ वर्षे तेच आमच्यासाठी बाप्पाची मूर्ती बनवतायंत. माझी आई कोकणातली आहे. त्यामुळे बाप्पासाठी स्पेशल उकडीचे मोदक बनतात आणि त्याचं प्रमाणंही खूप असतं, कारण खूप पाहुणे घरी येतात आणि सगळ्यांना मोदक भयंकर आवडतात. गौरींसाठी भाकरी आणि शेपूची भाजी असा खास नैवेद्य असतो. यावर्षी माझं बाप्पाकडे एक खास मागणं असणारं की मी जवळ जवळ ३ वर्षांनंतर ‘सूर राहू दे’ या झी युवाच्या मालिकेतून पुन्हा छोट्या पडद्यावर येत आहे. त्यामुळे जशी माझी ‘स्वप्नांच्या पलिकडले’ मालिका सुपरहिट झाली होती, तशीच ही मालिकाही यशस्वी होऊ दे. बाप्पा माझं नक्की ऐकेल, अशी माझी खात्री आहे.
(मोदक पाककृतींच्या विविधतेसाठी आणि खुद पर यकीन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोनाटा गणेशोत्सव अॅप डाउनलोड करा.)
- गौरी नलावडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonata ganeshotsav app and celebrity ganeshotsav