
नारळ्याच्या मोदका सोबत डाळीचे मोदक कसे बनवायचे जाणून घ्या.
तळलेल्या मोदकाचा बेत फसतोय? वापरा ही ट्रिक्स; बनवा सोबत डाळीचे मोदक
बाप्पाच्या नैवद्याला मोदक हा खास पदार्थ प्रत्येकांच्या घरी बनवला जातो. मग तो खव्याचा असो की उकडीचा. अगदीच तळलेला ही. पण कधीकधी तळलेल्या मोदकाचा बेत फसतो. अश्यावेळी त्याचे योग्य प्रमाण असणे खुप महत्वाचे मानले जाते. आज आपण खुसखुशीत तळलेल्या मोदकाची रेसीपी जाणून घेणार आहोत. त्याच बरोबर नारळ्याच्या मोदका सोबत डाळीचे मोदक कसे बनवायचे हे ही जाणून घेणार आहोत.
साहित्य :
पारीकरीता :
सव्वा कप मैदा किंवा गव्हाचे पीठ, एक चमचा तूप, चिमटभर मीठ.
सारणासाठी :
एक चमचा खसखस, एक वाटी ओला नारळ कीस, अर्धी वाटी साखर,वेलची पावडर, तेल.
कृती:
सुरवातीला एका पसरट ताटामध्ये मैदा घेऊन त्यात मीठ व तूप घालून मिसळून घ्या. थोडे थोडे पाणी घालून घट्ट गोळा तयार करा. हा गोळा अर्धा तास झाकून ठेवा. एका जाड बूडाच्या कढईत खसखस भाजून घ्या. त्यातच ओल्या नारळाचा खास टाकून पाच मिनिटे परतून घ्या. स्वादासाठी वेलची पूड घाला. सारण थंड होण्यास ठेवा. आता गोळ्याचे छोटे छोटे तुकडे करून पारी लाटून घ्या. पारीत सारन घालून मोदक तयार करून घ्या. आता सगळे मोदक तळून घ्या.
हरभरा डाळीचे मोदक
पारीकरीता :
एक कप मैदा, एक कप गव्हाचे पीठ, एक चमचा तूप, चिमटभर मीठ.
सारणासाठी :
एक चमचा खसखस, एक वाटी शिजलेली हरभरा डाळ, अर्धी वाटी गुळ ,वेलची पावडर, तेल किंवा तूप
कृती:
पारीसाठी: वरीलपमाणे पीठ भिजवून घ्या.
सारण :
हरभरा डाळ जशी पुरण पोळीला शिजवतात तशी शिजवून घ्या. त्यातील पाणी बाजूला करून त्यात गुळ घालून मिश्रण घट्ट शिजवून घ्या. त्यात वेलची पावडर घालून ते थंड होण्यासाठी ठेवा. आता छोटे छोटे गोळे करून पारीत सारण घालून मोदक वळून घ्या. गरम तेलात मोदक लालसर होईपर्यत तळून घ्या. थोडे थंड झाल्यानंतर बाप्पाला नैवद्य दाखवा.
टीप: मोदक तयार करताना त्याच्या कडा व्यवस्थित बंद कराव्यात.कढईत तेल गरम झाल्यावर मध्यम आचेवरच मोदक तळावे. डाळीचे मोदक करत असताना मैदा आणि गव्हाचे पीठ समप्रमाणात घ्या.