नाईक घराण्याचा गणपती हिरकमहोत्सवी वर्षाकडे 

अजय सावंत
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

कुडाळ - नेरूर कांडरीवाडी येथील सात कुटुंबीय असणाऱ्या नाईक घराण्याचा श्री गणपती सुवर्णमहोत्सवी वर्षाकडून हीरकमहोत्सवी वर्षाकडे दिमाखात वाटचाल करीत आहे. गेली 53 वर्षे गणेशाची एकच मूर्ती, ही या गणेशाची खास वैशिष्ट्ये आहेत. 

कुडाळ - नेरूर कांडरीवाडी येथील सात कुटुंबीय असणाऱ्या नाईक घराण्याचा श्री गणपती सुवर्णमहोत्सवी वर्षाकडून हीरकमहोत्सवी वर्षाकडे दिमाखात वाटचाल करीत आहे. गेली 53 वर्षे गणेशाची एकच मूर्ती, ही या गणेशाची खास वैशिष्ट्ये आहेत. 

कोकणात आज मोठ्या प्रमाणात एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. त्याची जागा आता छोट्या कुटुंब पद्धतीने घेतली आहे; मात्र बऱ्याच ठिकाणी अजूनही एकत्र कुटुंब पद्धती आहेत. काही घराण्यांमध्ये सात-आठ कुटुंबीयांचा एकच गणपती असतो. अशी प्रथा अजूनही कायमस्वरूपी टिकून राहिलेली आहे. या अनेक घराण्यामध्ये कुडाळ तालुक्‍यातील नेरूर कांडरीवाडी येथील नाईक कुटुंबीयांचा गणपती एकत्र असतो. नुकतीच या घराण्याच्या श्री गणेशाने 53 व्या वर्षांकडे वाटचाल केली असून सुवर्ण वर्षाकडून आता हीरकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. 

नाईक कुटुंब नोकरीनिमित्त मुंबईला वास्तवाला असते. गणेशचतुर्थी कालावधीत आठ दिवस अगोदर हे सर्व कुटुंब आपल्या नेरूर घराकडे येतात. या कुटुंबीयांनी आपल्या श्रीगणेशाचा सुवर्णमहोत्सवी वर्ष दिमाखात साजरा केला होता. या घराण्याची विशेष परंपरा म्हणजे श्रींची गणेशमूर्ती ही सुरुवातीपासूनच नेरूर मेस्त्रीवाडी येथील ज्येष्ठ मूर्तिकार दाजी मेस्त्री व विलास मेस्त्री घराण्याकडे असते. कित्येक वर्षांची परंपरा आजही टिकून आहे. गेली 53 वर्षे गणेशाची मूर्ती एकाच प्रकारची असते. मूर्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. ही गणेशमूर्तीची खासियत आहे. नाईक घराण्यातील सात कुटुंबीयांमध्ये चंद्रकांत नाईक, गोविंद नाईक, राघो नाईक, नरेंद्र नाईक, सुभाष नाईक, अनिल नाईक, सुनील नाईक, रमेश नाईक ही सात कुटुंबे एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. दरवर्षी गणेशोत्सव सोहळा दिमाखात साजरा करण्यासाठी कार्यरत झालेले दिसून येतात. 

अकरा दिवसांचा गणेश 
नाईक कुटुंबीयांची सुमारे शंभरहून अधिक माणसे श्रींची मनोभावे सेवा, पूजा-अर्चा योग्य प्रकारे करतात. या घराण्याचा गणपती अकरा दिवस असतो. विशेष म्हणजे गणपतीच्या पहिल्या व शेवटच्या दिवशी सात कुटुंबीयांच्या वतीने प्रत्येकी चार नैवेद्यांची पाने श्रींसमोर दाखविण्याची कित्येक वर्षाची परंपरा आजही टिकून आहे, असे नरेंद्र नाईक व मंगेश नाईक यांनी "सकाळ'ला सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Naik family special story