सिंधुदुर्ग : माड्याचीवाडीत 52 कुटुंबांचा अधिपती

अजय सावंत
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

कुडाळ - एकत्र कुटुंब पद्धती आज लोप पावत चालली आहे; मात्र माड्याचीवाडी येथील गावडे घराण्याने गेल्या पाच पिढ्यांचा वारसा जोपासताना त्यांच्या ५२ कुटुंबांचा अधिपती हे निश्‍चितच एकत्र कुटुंबाचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. पाच दिवसांचा त्यांचा गणपती असतो. ववसा कार्यक्रम हे सुद्धा या घराण्याचे वैशिष्ट्य आहे.

कुडाळ - एकत्र कुटुंब पद्धती आज लोप पावत चालली आहे; मात्र माड्याचीवाडी येथील गावडे घराण्याने गेल्या पाच पिढ्यांचा वारसा जोपासताना त्यांच्या ५२ कुटुंबांचा अधिपती हे निश्‍चितच एकत्र कुटुंबाचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. पाच दिवसांचा त्यांचा गणपती असतो. ववसा कार्यक्रम हे सुद्धा या घराण्याचे वैशिष्ट्य आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. हे आपल्याला सऱ्हास दिसून येते. आजी - आजोबा, मुलगा मुलगी, नातवंडे त्यांचा वावर आजच्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये फारच कमी प्रमाणात दिसून येतो. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सर्वांना जे सामाजिक वातावरण मिळते ते आता सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या कुटुंब पद्धतीत मिळत नाही. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती अजूनही चिरकाल टिकून आहे. असेच एक उदाहरण द्यायचे झाल्यास माड्याचीवाडी येथील गावडे घराण्याचे देता येईल. 

गेली पाच पिढ्या असणाऱ्या या गावडे घराण्यांमध्ये ५२ कुटुंबांचा हा गणपती असतो. गणपतीच्या दिवशी या देवघरांमध्ये सुमारे तीनशे ते चारशे माणसे या गणेशोत्सव कालावधीत एकत्र आल्याचे दिसून येतात. ही सर्व ५२ कुटुंबे नेरूर, वाघचौडी येथे वास्तव्य करतात. गणेशोत्सव कालावधीत ते माड्याचीवाडी येथे आपल्या मूळ देवघरच्या ठिकाणी जिथे श्री गणेशाचे पूजन होते त्याठिकाणी येतात. 

या घराण्यात शाम गावडे यांचा परिवार असतो. माड्याचीवाडी ग्रामपंचायतनजीक हे घराणे आहे. पाच दिवस मनोभावे सेवा अर्चा केली जाते. विशेष म्हणजे या गणपतीच्या पाचही दिवस स्थानिक भजनांना याठिकाणी प्राधान्य देण्यात येते. स्थानिक भजने मोठ्या प्रमाणात याठिकाणी पाचही दिवस होत असतात. 

आताची गावडे घराण्याची ही पाचवी पिढी असून या घराण्याचा गणपती गेली तीन पिढ्या नेरूर, वाघोसेवाडी येथील मधुकर सडवेलकर या घराण्याकडे आहे. दरवर्षी गणेशाची एकच मूर्ती असते. ही मूर्ती सुमारे अकरा फूट उंचीची असते. गेल्या पाच पिढ्यांमध्ये गणेशमूर्ती आजतागायत बदललेली नाही. सुख-दुःखाचे कार्य घडले, तरी गणपती हा पाच दिवसांचाच असतो. पाच दिवसांवर गणपती ठेवला जात नाही, ही परंपरा गेली पाच पिढ्या सुरू आहे.

घराण्याचा ववसा कार्यक्रम आकर्षण
या घराण्याचा ५२ कुटुंबांचा हा गणपती सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र परिचित आहेच, शिवाय या घराण्याचा ववसा हा धार्मिक कार्यक्रम फार मोठा असतो. पाचव्या दिवशी ५२ कुटुंबातील सुमारे दीडशे महिला ववसा घेऊन या गणपतीच्या ठिकाणी येतात. सायंकाळी पाचपर्यंत हा कार्यक्रम चालतो. त्यानंतर महाप्रसाद होतो. रात्री उशिरा श्रींचे विसर्जन हे घरानजीक असणाऱ्या नदीमध्ये केले जाते. हा भक्तिमय सोहळा संपण्यासाठी रात्रीचे अकरा ते बारा वाजतात, अशी माहिती ‘सकाळ’शी बोलताना पिंट्या गावडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madyachiwadi Ganesh idol in Sindhudurg special story