घरगुती मूर्तीकामातून उत्सवाचा 'श्रीगणेशा' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

पिंपरी : घरगुती गणेशमूर्तींच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. अगदी 10 इंच उंचीच्या मूर्तीची किंमतही 450 रुपये आहे. त्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांपासून चिंचवड परिसरातील अनेक जण स्वत:च मूर्ती तयार करण्यास प्राधान्य देत आहेत. 

पिंपरी : घरगुती गणेशमूर्तींच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. अगदी 10 इंच उंचीच्या मूर्तीची किंमतही 450 रुपये आहे. त्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांपासून चिंचवड परिसरातील अनेक जण स्वत:च मूर्ती तयार करण्यास प्राधान्य देत आहेत. 

लाडक्‍या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील गृहिणी गणेशोत्सवात विविध प्रकारचे पदार्थ तयार करीत असतात. त्याचप्रमाणे पुरुषही त्यांच्या परीने सजावट करण्यात मग्न असतात. त्यासाठी खर्चही मोठा होत असतो. पूर्वी गणेशमूर्तीच्या किमती कमी होत्या. त्यामुळे अनेक जण विकत घेऊन गणेशमूर्ती बसवीत असत. मात्र गेल्या काही वर्षांत वाढत्या महागाईमुळे गणेशमूर्तीही महाग होत गेल्या. त्यानुसार घरगुती पद्धतीने मूर्ती बनविण्याचे प्रमाण वाढू लागले. 

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीला प्राधान्य दिले जाते. साधारणपणे एक फूट उंचीची गणेशमूर्ती तयार करण्यासाठी दोन किलो शाडूच्या मातीची गरज असते. शाडूची माती प्रतिकिलोस 30 रुपये या भावाने मिळते. त्यानुसार सुमारे दोन किलो मातीसाठी 60 रुपये मोजावे लागतात. त्याचप्रमाणे 100 ते 150 रुपयांचा रंग खरेदी केल्यास केवळ 200 ते 250 रुपयांमध्ये घरगुती मूर्ती तयार होते. एक फूट उंचीच्या बाजारातील तयार मूर्तीचा भाव एक हजार 500 रुपये आहे. गणेशमूर्तीच्या किमतीतील या मोठ्या फरकामुळेच अनेकांनी घरगुती पद्धती अवलंबली आहे. मूर्ती बनविण्यासाठी लागणारे कोरीव कामासाठीचे साहित्य (कार्व्हिंग टूल) 70 ते 400 रुपयांपर्यंत मिळते. यासाठी एकदाच खर्च येतो. राजकीय पक्षांचे अनेक कार्यकर्तेही गणपती बनविण्याची मोफत कार्यशाळा घेतात. त्यामध्येही अनेक जण मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतात. 

तीन-चार वर्षांपूर्वी आम्ही प्रत्येकी 30 किलोची केवळ दोन-तीन पोती शाडूची माती विकत होतो. आता मात्र 150 ते 200 पोती माती विकतो. गणेशमूर्तींच्या वाढत्या किमतीमुळे स्वत:च मूर्ती बनविण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. 
- बिपिन तलाठी, विक्रेता, चिंचवड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrate festival by making Shree Ganesha's idol at House