Video : घरच्या घरी मखर बनवू, वाचलेल्या पैशांनी पूरग्रस्तांना मदत करू!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 August 2019

'सकाळ' तुम्हाला मखर बनविण्यासाठी डिझाईन पुरवणार आहे. सहजासहजी मखर घरी बनवता येईल, अशा या डिझाईन असणार आहेत. या मखरांवर येणार खर्च बाजाराच्या तुलनेत खूपच कमी आहे. यातून जे पैसे वाचतील ते 'सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या मदतीला पाठवता येतील. मखर विकत आणण्यापेक्षा मुलांसोबत ते घरीच तयार करून पूरग्रस्तांना मदत केल्याचा आनंद नक्कीच जास्त असेल. 

पुणे : गणेशोत्सव आला की आपण बाजारात जाऊन बाप्पांसाठी मखर घेऊन येतो. त्या ठिकाणी पर्यायही मर्यादित उपलब्ध असतात आणि त्यात खर्चही बराच होतो. हा खर्च वाचवून पूरग्रस्तांना मदत व्हावी, या हेतूने 'सकाळ'च्या वतीने 'घरच्या घरी मखर बनवा' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

या उपक्रमांतर्गत 'सकाळ' तुम्हाला मखर बनविण्यासाठी डिझाईन पुरवणार आहे. सहजासहजी मखर घरी बनवता येईल, अशा या डिझाईन असणार आहेत. या मखरांवर येणार खर्च बाजाराच्या तुलनेत खूपच कमी आहे. यातून जे पैसे वाचतील ते 'सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या मदतीला पाठवता येतील. मखर विकत आणण्यापेक्षा मुलांसोबत ते घरीच तयार करून पूरग्रस्तांना मदत केल्याचा आनंद नक्कीच जास्त असेल. 

कसे बनविणार हे मखर? 
1. 'सकाळ'च्या शुक्रवारच्या (दि. 30) अंकात विविध पानांवर मखराची डिझाईन छापली जातील. मखराची पुढील बाजू, मागील बाजू आणि सजावट हे भाग यात असतील. (मखराच्या वरचा आणि खालचा भाग छापला जाणार नाही. त्यासाठी 14 इंच x14 इंच आकाराचे पुठ्ठे वापरावेत.) 
2. दिलेल्या आउटलाइननुसार हे सर्व भाग व्यवस्थित कापून घ्या. 
3. घरात येणाऱ्या पॅकेजिंगच्या पुठ्ठ्यांवर किंवा कार्डबोर्डवर हे सर्व भाग चिकटवून घ्या. 
4. पुठ्ठे आकारानुसार कापून घ्या. 
5. हे सगळे भाग आवडीच्या रंगांमध्ये रंगवा किंवा रंगीत कागद चिकटवा. रंगवताना कुठले तुकडे कुठे लावायचे हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे रंगसंगती ठरवा. 
6. रंगवलेले तुकडे वाळल्यानंतर डिंक आणि चिकटपट्टीच्या मदतीने सगळे भाग जोडून घ्या. 
7. तयार मखराला मणी, टिकल्या, ग्लिटर, लेस व इतर शोभेच्या वस्तू वापरून सजवायला 'इको फ्रेंड'ली गोष्टींचा वापर करा. 
8. हे मखर आता 11 इंच किंवा त्यापेक्षा लहान आकाराच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी सज्ज आहे. 

सोशल मीडियावर छायाचित्रे शेअर करा 
या मखरात गणपतीची स्थापना केल्यानंतरचे छायाचित्र #MyBappaMyMakhar हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर शेअर करा, आणि mymakhar@esakal.com इथे पाठवा. उल्लेखनीय फोटो 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध केले जातील. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homemade Makhar Activity Organized by Sakal