रुद्रतेज ढोल-ताशा पथक : सर्वांनी एकत्र यावे म्हणून वादन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

सकाळच्या ऑनलाईन ढोल-ताशा स्पर्धेत पुण्यातली पथके सहभागी झाली आहे. ही पथके केवळ वादनापुरती मर्यादित नाहीत. या पथकांचे सामाजिक कामही मोठे आहे. आपापल्या परीने ही मंडळी विविध सामाजिक कामांत कार्यरत असतात. या सहभागी पथकांची माहिती येथे देत आहोत. सोबत त्यांच्या वादनाच्या फेसबूक पोस्टची लिंकही आहे. आपण या लिंकवर जाऊन या पथकांचे वादन ऐका आणि त्यांना लाईक, शेअर, कॉमेंट करुन दादही द्या...

हडपसर हे पुणे शहराच्या पूर्वेकडील एक गाव असाच पूर्वी परिचय होता. परंतु आयटी क्षेत्राचा या भागात शिरकाव झाल्याने हडपसर हे सबंध भारतामध्ये नावाजले जाऊ लागले. पुण्य नगरीची संस्कृती आत्मसात होऊ लागली परंतु तरीही २०११ पर्यंत हडपसर मध्ये ढोल ताशा पथकाची संस्कृती कोणी अंगिकारली नव्हती.

 एक खंत अशी होती की हडपसर मधील लोकांना गणपती मधील ढोल ताशांच्या मिरवणूका पाहण्यासाठी आणि वादनाचा आवड असणाऱ्यांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जावे लागत होते. 

हडपसर मधील तरुणांमध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा आहे, कामाचा वेग आहे. परंतु, त्यांना एका लाईन लेंथ मध्ये आणण्यासाठी एखादे संघटन गरजेचे आहे हा विचार लक्षात घेता हडपसर येथील अमित गायकवाड नावाच्या  कार्यकर्त्याने  मनाशी चंग बांधला आणि आपल्या २-५ सहकाऱ्यांना बरोबर घेऊन दि.२७/१०/२०११ रोजी हडपसर येथील तुकाई मातेचे दर्शन घेऊन एका पर्वाला प्रारंभ केला. आणि रुद्रतेज प्रतिष्ठान रुद्रतेज ढोल ताशा पथकाची स्थापना केली. हे हडपसर पंचक्रोशीतील पहिले पथक आहे.

 वाजवण्यासाठी एकत्र न येता एकत्र येण्यासाठी वाजवणे हे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेऊन भरकटणाऱ्या तरुण पिढीला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी रुद्रतेज प्रतिष्ठान हे गेली ८ वर्षांपासून वादनासोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.पथकामध्ये सध्या ३०० च्या आसपास वादक मुला मुलींची संख्या असून यामध्ये तरुण तरुणी सोबतच अबाल वृद्ध ही हिरीरीने सहभाग घेतात. आणि वर्षभर हाती घेतलेल्या विविध उपक्रमामध्ये सहभागी होतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information Rudratej Dhol-Tasha Pathak