Video : स्वातंत्र्यपूर्व काळातील आझाद हिंद मंडळ; सुभाषचंद्र बोस यांच्या कॅप्टनच्या सांगण्यावरून बदलले नाव, वाचा...

सुधीर भारती
Tuesday, 18 August 2020

अमरावती शहरामधील काही मोजक्या जुन्या सार्वजनिक मंडळांपैकी आझाद हिंद मंडळाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९२८ मध्ये रॉयल क्लब नावाने या भागातील तरुण मंडळींनी एका मंडळाची स्थापना करून देशसेवेत स्वतःला समर्पित केले.

अमरावती : केवळ अमरावतीच नव्हे तर विदर्भात सुपरिचित बुधवारास्थित आझाद हिंद मंडळ केवळ गणेशोत्सवापूरताच मर्यादित न राहता सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यातसुद्धा अग्रेसर आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्रसेवेला समर्पित आझाद हिंद मंडळाची आता शताब्दीकडे वाटचाल सुरू झालेली आहे. अमरावतीकरांना घरबसल्या तिरुपती बालाजी, पंढरीचा विठ्ठल, ताजमहल, पद्मनाभ मंदिर या ऐतिहासिक मंदिरांचे दर्शन घडविण्याचा संकल्प घेतलेल्या आझाद हिंद मंडळाची वाटचाल मात्र खूप आव्हानात्मक काळापासून झाली आहे.

अमरावती शहरामधील काही मोजक्या जुन्या सार्वजनिक मंडळांपैकी आझाद हिंद मंडळाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९२८ मध्ये रॉयल क्लब नावाने या भागातील तरुण मंडळींनी एका मंडळाची स्थापना करून देशसेवेत स्वतःला समर्पित केले. स्वतंत्रता आंदोलनात या क्लबमधील सदस्यांचा सिंहाचा वाटा होता. वीर वामनराव जोशी, नानासाहेब बामणगावकर, अण्णासाहेब कलोती, कोनलाडे बंधू यासारखे अनेक सेनानी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले.

विशेष म्हणजे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे कॅप्टन शाहनवाझ खान यांनी रॉयल क्लबच्या सदस्यांची भेट घेतली आणि त्यांच्या सूचनेवरून रॉयल क्लबचे नामकरण आझाद हिंद मंडळामध्ये करण्यात आले. अमरावतीचे तत्कालीन नगराध्यक्ष हरिभाऊ कलोती यांच्या अध्यक्षतेत मंडळाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत होते. पुढे कलोती यांच्यानंतरसुद्धा मंडळाचे सामाजिक उपक्रम सुरूच राहिले.

नानासाहेब दिघेकर, रंगकर्मी राजाभाऊ मोरे, विलास इंगोले, दिलीप कलोती, माजी खासदार अनंत गुढे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सोमेश्वर पुसतकर या मंडळींनी मंडळाची धुरा सामूहिकपणे यशस्वीपणे सांभाळली. सध्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

तिरुपती बालाजी, पद्मनाभ मंदिर, ताजमहाल, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, अजिंठा वेरूळच्या लेण्या, दर्यापूर परिसरातील लासूरचे हेमाडपंथी मंदिर यासह अनेक ऐतिहासिक देखावे साकारून मंडळाने दरवर्षी गणेशोत्सवात अमरावतीकरांना एक पर्वणी उपलब्ध करून दिली. दिवंगत सोमेश्वर पुसदकर यांचा यामध्ये सिंहाचा वाटा राहिला आहे.

सामाजिक कार्यात पुढाकार

केवळ गणेशोत्सवापूरतेच मर्यादित न राहता सामाजिक कार्यातसुद्धा मंडळाचा सक्रिय सहभाग राहिला आहे. हरिभाऊ कलोती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य सभागृह बांधण्यात आले असून, मंडळाच्या परिसरातच धर्मार्थ दवाखाना, वाचनालय, व्यायाम शाळा उभारण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे आझाद हिंद मंडळाने शहराला अनेक राजकीय नेते दिले. राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडूंनी लौकिक मिळविला. नाट्यक्षेत्रात राजाभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनात विविध नाट्यस्पर्धांमध्ये मंडळाच्या युवकांनी नावलौकिक मिळविला. २००२ मध्ये हीरक महोत्सवानिमित्त स्थापन करण्यात आलेली चांदीची मूर्ती तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षाची संगमरवर दगडाची मूर्ती आकर्षणाचे केंद्र ठरले.

सोमेश्वर पुसतकर यांची कमी जाणवणार

सोमेश्वर पुसतकर हे या मंडळाचे सक्रिय सदस्य होते. गणेशोत्सवाच्या काळात सर्व जबाबदारी सांभाळून अमरावतीच नव्हे तर ठिकठिकाणच्या कलावंतांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी ते प्रचंड झटले. आपल्या येथील कलावंतांच्या हातात काय कला आहे हे त्यांनी विदर्भच नव्हे तर महाराष्ट्राला दाखवून दिले. अतिशय कल्पक विचारातून दरवर्षी देखावा जिवंत करण्याची त्यांची खुबी होती. या देखाव्यातून ऐतिहासिक ठेव्याकडे नागरिक तसेच शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. गणेशोत्सव हा त्यांच्यासाठी जीव की प्राण होता. मात्र, काळाने त्यांना हिरावून नेल्याने बुधवारा सुना सुना झाला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेली परंपरा आजही कायम
मंडळाच्या आजवरच्या वाटचालीत सर्व पदाधिकारी तसेच सदस्यांचा सिंहाचा वाटा आहे
. सर्व मतभेद, पक्षभेद विसरून सर्व मंडळी एकदिलाने काम करीत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम असून, भविष्यातदेखील कायम राहणार आहे.
-दिलीप कलोती,
सचिव, आझाद हिंद मंडळ, बुधवारा, अमरावती

 

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Azad Hind Mandal in Amravati celebrating Ganesh festival since 1928 read full story