जीनपिंग भारतभेटीवर; चेन्नईमध्ये मोदींशी होणार अनौपचारिक चर्चा 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शुक्रवारी (ता. 11) भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत त्यांची चेन्नईत अनौपचारिक बैठक होईल. वुहान येथे दोन्ही नेत्यांची एप्रिल 2018 मध्ये अनौपचारिक बैठक झाली होती. त्याच मालिकेतील ही दुसरी बैठक आहे. 

नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शुक्रवारी (ता. 11) भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत त्यांची चेन्नईत अनौपचारिक बैठक होईल. वुहान येथे दोन्ही नेत्यांची एप्रिल 2018 मध्ये अनौपचारिक बैठक झाली होती. त्याच मालिकेतील ही दुसरी बैठक आहे. 

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आज निवेदन जारी करून दोन्ही नेत्यांच्या 'शिखर भेटीची' घोषणा केली. चेन्नईनजीक मामल्लापुरम येथे ही भेट होईल. यादरम्यान दोन्ही नेते द्विपक्षीय, प्रादेशिक तसेच जागतिक महत्त्वाच्या मुद्यांवर, भारत आणि चीनची वाढती भागीदारी, विविध क्षेत्रांतील परस्पर सहकार्य आदी विषयांवर चर्चा करतील.

भारतीय पंतप्रधानांच्या निमंत्रणानुसार हा दौरा होत असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात नमूद केले आहे. अर्थात, या वेळी दोन्ही देशांदरम्यान कोणतेही करार होणार नाहीत. मागील वर्षी वुहान येथील अनौपचारिक बैठकीची घोषणा पाच दिवसांपूर्वीच झाली होती. डोकलामप्रकरणात चीनचा आडमुठेपणा आणि भारताने घेतलेली कणखर भूमिका यामुळे दोन्ही देशांमध्ये तब्बल दोन महिन्यांहून अधिककाळ चाललेला तणाव निवळण्यात वुहान बैठक महत्त्वपूर्ण ठरली होती.

अनिश्‍चिततेचे वातावरण 
या साऱ्या पार्श्‍वभूमीवर चिनी राष्ट्राध्यक्षांच्या यंदाच्या भारत दौऱ्याबद्दल चीनकडून काहीही कळविण्यात आले नसल्याने अनिश्‍चिततेचे वातावरण होते. परराष्ट्र मंत्रालयाने देखील या प्रस्तावित दौऱ्याबाबत बोलणे टाळले होते. आज अखेर चीनकडून होकार आल्यानंतर ही घोषणा झाली आहे. या प्रस्तावित भेटीच्या अवघे काही आठवडे आधी पूर्वेकडील सीमेवर भारतीय लष्कराचा 'ऑपरेशन हिमविजय' हा आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धसराव, त्याचप्रमाणे लडाख तसेच अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एम-777 हॉवित्झर तोफा तैनात करण्याचा निर्णय, यातून भारताने दिलेला कणखरतेचा दिलेला संदेश चिनी अस्वस्थतेचे कारण मानले जात आहे.

काश्‍मीरबाबत चीनचे घूमजाव 
बीजिंग : 
जम्मू-काश्‍मीरच्या मुद्यावरून चीनच्या भूमिकेमध्ये सातत्याने बदल होत असून, आज पुन्हा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी नवे वक्तव्य करून आंतरराष्ट्रीय समुदायाला बुचकळ्यात पाडले आहे. ''काश्‍मीरमधील स्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, पाकिस्तानच्या मूळ हितसंबंधांशी निगडित मुद्यांचा प्रश्‍न असेल, तर आम्ही निश्‍चितपणे त्यांना पाठिंबा देऊ'' असे जिनपिंग यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी जिनपिंग यांची भेट घेत विविध द्विपक्षीय मुद्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी जिनपिंग यांनी 'थेट काश्‍मीरमध्ये हस्तक्षेप करणे टाळत उभय देशांनी चर्चेच्या माध्यमातून प्रश्‍न सोडवावेत' अशी भूमिका मांडली. भारत सरकारने जम्मू आणि काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्याने पाकिस्तानसोबतचे द्विपक्षीय संबंध ताणल्या गेले आहेत. आज चीननेही पूर्वीच्या भूमिकेवरून घूमजाव केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jinping in India to hold informal talks with Modi at Chennai