'अभिनंदनला सोडा नाहीतर भारत हल्ला करेल'; पाकिस्तानला होती भीती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

परराष्ट्र मंत्री शाह कुरेशींचे पाय कापत होते. त्यांना दरदरुन घाम फुटला होता.

इस्लामाबाद- भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानमधून सोडण्यात आले होते. परंतु, अजूनही त्यावरुन पाकिस्तानमध्ये राजकारण सुरु आहे. आता पाकिस्तानचे खासदार अयाज सादिक यांनी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यावर आरोप केले आहेत. भारत पाकिस्तानवर हल्ला करणार आहे त्यामुळे अभिनंदन यांना सोडणे गरजेचे होते, असा दावा शाह यांनी केला होता, असे अयाज सादिक यांनी म्हटले आहे. 

खासदार अयाज सादिक संसदेत म्हणाले की, शाह महमूद कुरेशी त्या बैठकीत होते. ज्यात इम्रान खान यांनी येण्यास नकार दिला होता. कुरेशींचे पाय कापत होते. त्यांना दरदरुन घाम फुटला होता. आता अभिनंदला परत जाऊ द्या कारण भारत रात्री नऊ वाजता पाकिस्तानवर हल्ला करत आहे, असे कुरेशी म्हणाले होते. त्याचबरोबर त्यांनी कुलभूषण जाधव यांच्यासाठी आम्ही अध्यादेश घेऊन आलो नव्हतो. या सरकारने एक-दोन महिने अध्यादेश लपवून ठेवला होता, असा आरोप केला. 

अयाज म्हणाले की, भारत हल्ला करणार नव्हता. सरकारला फक्त गुडघे टेकवून अभिनंदनला भारतात परत पाठवायचे होते आणि त्यांनी ते केले. 

हेही वाचा- अग्रलेख : दोघांचे भांडण, दोघांचा लाभ!

गेल्यावर्षी भारताने बालाकोट येथील दहशतवादी शिबिरांवर एअर स्ट्राइक केले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकने फायटर जेट भारतात हल्ल्यासाठी पाठवले होते. त्या फायटर जेटला माघारी धाडण्यासाठी अभिनंदन वर्धमान यांनी मिग-21 विमानातून पाठलाग केला होता. अभिनंदन यांनी पाकचे विमान खाली पाडले परंतु, त्यांचं विमानही पीओकेत कोसळले होते. 

हेही वाचा- फक्त 1 रुपयात पोटभर जेवण!

पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना पकडले होते. चौकशीदरम्यान पाकिस्तानी लष्कराने त्यांना चहा पिण्यास दिलेला व्हिडिओ शेअर केला होता. अभिनंदन यांची आम्ही कशी काळजी घेत आहोत, हे दाखवण्याचा पाकचा प्रयत्न होता. दरम्यान, अभिनंदन यांना 1 मार्च रोजी अटारी-वाघा सीमेवरुन भारतात परत पाठवण्यात आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To Let Abhinandan Varthaman Go Or Else India Would Attack told Pakistan Foreign Minister Shah Mahmood Qureshi