पावसातूनही प्लास्टिकचा वर्षाव!

CNN
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या अभ्यासातील निष्कर्ष

वॉशिंग्टन: अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ इंटेरिअर आणि भूशास्त्र विभागाने केलेल्या एका अभ्यासपूर्ण सर्वेक्षणामध्ये पावसामध्ये प्लास्टिकचेदेखील सूक्ष्म रंगीत कण सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. प्लास्टिकचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे, की पावसात प्लास्टिकचे कण येण्याचे नेमके स्रोत काय, हे स्पष्ट होत नाही; तरीदेखील पावसात प्लास्टिक आढळणे हे धोक्‍याचे लक्षण असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, प्लास्टिकचे हे कण इतके सूक्ष्म आहे, की ते उघड्या डोळ्यांनी बघता येत नाही. त्यासाठी डिजिटल कॅमेराच्या विशेष लेन्सचा वापर करण्यात आल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

या अभ्यासासाठी निश्‍चित केलेल्या एकूण नमुन्यांपैकी जवळपास 90 टक्के नमुन्यांमध्ये प्लास्टिक आढळले. प्रामुख्याने फायबर स्वरूपातील प्लास्टिकचे कण हे विविध रंगांमध्ये आढळले आहे. त्यातील सर्वाधिक कण हे निळ्या रंगाचे असून त्यापाठोपाठ लाल, चंदेरी, जांभळा, हिरवा, पिवळा आणि अन्य रंगाचे कण आढळले. यापूर्वी दक्षिण फ्रान्समधील पायरेन्स येथे पडलेल्या पावसातदेखील प्लास्टिकचे कण आढळले होते. प्लास्टिकचे असंख्य कण समुद्रात मिसळल्याने माशांसह अनेक जलचर प्राण्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होत आहे. यापूर्वी झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले, की दर आठवड्याला मानवाच्या शरीरात सरासरी 5 ग्रॅम प्लास्टिक जाते, ज्याचे वजन एका क्रेडिट कार्डएवढे असते, एवढी भयंकर परिस्थिती मानवाने निर्माण केली आहे.
-----
ट्रम्प यांचा चीनला टोला
मंगळवारी एका प्लास्टिक कारखान्याला दिलेल्या भेटीप्रसंगी प्लास्टिकच्या वाढत्या वापराविषयी विचारले असता त्याला चीन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. चीनसह आशिया खंडातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा आपल्याकडे येत आहे. प्लास्टिकचा तुम्ही वापर कसा आणि किती करता, यावर त्याची परिणाम अवलंबून आहे. अनेक देश पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करत नसल्याने प्लास्टिकची समस्या वाढल्याचे ट्रम्प म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PLASTIC RAIN AMERICAN Scientist STUDY