#FacebookDown फेसबुक, इन्स्टाग्रामची सेवा विस्कळित

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 मार्च 2019

नेटिझन्सनी आज (गुरुवार) सकाळी फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापर करताना तांत्रिक अडचण येत असल्याची तक्रार ट्विटरवर केली. यामुळे ट्विटरवर #FacebookDown #instagramdown हे ट्रेण्ड टॉप टेनमध्ये आले आहेत.

न्यूयॉर्क: भारतासह जगभरातील काही भागांमध्ये व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा अद्यापही विस्कळितच आहे. नेटिझन्सनी आज (गुरुवार) सकाळी फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापर करताना तांत्रिक अडचण येत असल्याची तक्रार ट्विटरवर केली. यामुळे ट्विटरवर #FacebookDown #instagramdown हे ट्रेण्ड टॉप टेनमध्ये आले आहेत. फेसबुकला तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागल्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.

बुधवारी (ता. 13) सकाळपासून यूजर मेसेज पाठवू शकत नव्हते, तसेच ते नव्या पोस्टही टाकू शकत नव्हते. नंतर फेसबुकने सेवा विस्कळित झाल्याचे जाहीर करून त्यावर उपाययोजना सुरू असल्याचे अखेरीस जाहीर केले. मात्र, अद्यापही सेवा सुरळीत झालेली नाही.

व्हॉट्‌सऍपची सेवा प्रामुख्याने भारत, बांगलादेश, पॅराग्वे, अर्जेंटिना आणि इतर अनेक देशांमध्ये विस्कळित झाली. या देशांमधील यूजरना मेसेज पाठविण्यात अनेक अडचणी येत होत्या. ब्राझीलमध्येही ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवली. फेसबुक मेसेंजर संगणकावर लोड होत नव्हते आणि मोबाईल ऍपही काम करीत नसल्याचा अनुभव अनेक यूजरना आला. याचबरोबर फेसबुकवर जाहिरातींचा सेक्‍शनही योग्यपणे काम करीत नव्हता. इन्स्टाग्रामवर नव्या स्टोरी पोस्ट करता येत नव्हत्या आणि मेसेजही पाठवता येत नव्हते.

नेटिझन्सला आज सकाळी फेसबुकवर लॉग इन करता येत नव्हते. फेसबुककडून दिलगिरी व्यक्त करणारा संदेश स्क्रीनवर झळकत आहे. 'फेसबुक सध्या देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी बंद असून लवकरच सेवा पूर्ववत होईल. तुम्ही दाखवलेल्या संयमासाठी धन्यवाद', असे यात म्हटले आहे.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद असल्याने ट्विटरवर अनेक युझर्सनी राग व्यक्त केला. ट्विटरवर काही नेटिझन्सनी विनोदही ट्विट केले. आता माझ्या फोनचा वापर फक्त शॉपिंगसाठीच करता येणार, असे एका युझरने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #FacebookDown and Instagram Are Down for Some Users