निर्वासितांमुळे शंभर कोटी डॉलरचा भुर्दंड : डोनाल्ड ट्रम्प

पीटीआय
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

अमेरिका इराणसोबत नव्याने करार करण्यास तयार आहे, या देशाची आण्विक सज्जतेच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल रोखण्यासाठी अधिक सर्वसमावेशक करार करण्याचा आमचा प्रयत्न असेल. 

- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा बेकायदा स्थलांतरितांचा मुद्दा मांडत यामुळे अमेरिकेतील करदात्यांना दरवर्षी शंभर कोटी डॉलरचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे. बेकायदा स्थलांतरितांसाठी अमेरिकेच्या सीमा खुल्या केल्या जाव्यात, या विरोधकांच्या मागणीचाही त्यांनी समाचार घेतला. डेमोक्रॅटिक पक्षाची ही भूमिका त्यांनी चुकीची ठरविली. 

एल सेल्वाडोर, होंडुरास आणि ग्वाटेमाला या लॅटिन अमेरिकी देशांमधील पाच ते सात हजार निर्वासित अमेरिकेमध्ये घुसण्याच्या तयारीत असून, सध्या त्यांनी मेक्‍सिकोच्या सीमेवर तळ ठोकला आहे. या बेकायदा निर्वासितांना रोखण्यासाठी आम्ही सीमावर्ती भागांमध्ये सैनिकांना तैनात केले आहे. आमचे सैनिक त्यांच्यावर गोळ्या झाडणार नाहीत; पण त्यांनी दगडफेक केल्यास मात्र त्यांना निश्‍चितपणे अटक केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. ते इंडियाना प्रांतामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते. 

डेमोक्रॅटिक पक्षाचे स्थलांतरविषयक धोरण हे अमेरिकीची तिजोरी कंगाल करणारे असून, यामुळे येथील समुदायालाही याचा फटका बसू शकतो. अमेरिकेत येणारे शंभर टक्के हेरॉइन हे दक्षिण सीमेवरून येते. यामुळे देशातील तरुण पिढी बरबाद होत आहे. लॅटिन अमेरिकेतून येणाऱ्या स्थलांतरितांमध्ये काही गुन्हेगारांचादेखील समावेश आहे.

अमेरिकेने गंभीर गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या तीनशे लोकांना शोधून काढले आहे. या लोकांनी आमच्याकडे जरूर यावे, पण कायदेशीर मार्गाने, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. सहा नोव्हेंबर रोजी अमेरिकेत होणाऱ्या मध्यावधी निवडणुका या केवळ सुरक्षेच्या मुद्याभोवतीच केंद्रित असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मेक्‍सिकन सीमेवर लष्कर पाठविण्याचा ट्रम्प यांचा निर्णय हा केवळ राजकीय स्टंट आहे, तेथे हजारो गरीब निर्वासित अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी वाट पाहत आहेत. ही काही देशभक्ती नव्हे. 

- बराक ओबामा, माजी अध्यक्ष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 Crores Dollar Losses due to refugees says Donald Trump