विमान कोसळून क्‍युबात 100 ठार

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

हवाना विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात विमान कोसळून 100 प्रवासी ठार झाले. या अपघातातून तीन प्रवासी आश्‍चर्यकारकपणे बचावले आहेत. क्‍युबातील ही गेल्या 30 वर्षांतील सर्वांत मोठी दुर्घटना असल्याचे अधिकारी व सरकारी प्रसिद्धिमाध्यमांनी सांगितले. 
 

हवाना (क्‍युबा) - हवाना विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात विमान कोसळून 100 प्रवासी ठार झाले. या अपघातातून तीन प्रवासी आश्‍चर्यकारकपणे बचावले आहेत. क्‍युबातील ही गेल्या 30 वर्षांतील सर्वांत मोठी दुर्घटना असल्याचे अधिकारी व सरकारी प्रसिद्धिमाध्यमांनी सांगितले. 

हवानातील जोस मार्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बोइंग 737 या विमानाने शुक्रवारी (ता. 18) रात्री बाराच्या दरम्यान पूर्व क्‍युबातील होलग्युईनकडे उड्डाण केले होते. काही वेळातच ते शेतात कोसळले. विमानात कर्मचाऱ्यांसह 105 प्रवासी होते. यात पाच मुले होती. मृतांमध्ये अर्जेंटिनाचे दोन आणि मेक्‍सिकोच्या काही नागरिकांचा समावेश आहे. विमान पडल्यानंतर लगेचच आग लागली. ती तातडीने विझविण्यास यश आले असून, मृतांची ओळख पटविण्याचे काम अधिकाऱ्यांनी हाती घेतले असल्याचे क्‍युबाचे अध्यक्ष मिग्युअल डायझ कॅनेल यांनी सांगितले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू झाला आहे. 

मृतांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवारी (ता. 20) क्‍युबात दुखवटा पाळण्यात येणार आहे. या वेळी सरकारी व लष्करी इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर आणणार आहेत. क्‍युबाचे माजी अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. या अपघातानंतर अमेरिकेच्या बोइंग कंपनीतर्फे तांत्रिक मदत देण्याची तयारी दर्शविली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 killed in Cuba plane crash