दुबईत बस अपघातात बारा भारतीयांसह 17 ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जून 2019

दुबई येथे झालेल्या भीषण बस अपघातामध्ये सतरा जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये बारा भारतीयांचा समावेश आहे.

दुबई : संयुक्त अरब अमितरातीमध्ये (यूएई) दुबई येथे झालेल्या भीषण बस अपघातामध्ये सतरा जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये बारा भारतीयांचा समावेश आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने आज (शुक्रवार) दिली.

ओमानहून दुबईला येणारी बस रस्त्याच्याकडेला असलेल्या साईनबोर्डला धडकल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या अपघातामधील अन्य नऊजण गंभीर जखमी झाले असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. बस चालकाने चुकीच्या मार्गावर ही बस नेल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

बसूमधून 31 जण प्रवास करत होते. अपघातानंतर बसची डावी बाजू कापली गेल्यामुळे काही प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. स्थानिक प्रमाणवेळेनुसार गुरूवारी सायंकाळी सहा वाजता हा अपघात झाला. या दुर्घटनेवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने खेद व्यक्त केला आहे.

दरम्यान, मृतांपैकी काहींची ओळख पटू शकलेली नाही. ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती दुबई पोलिसांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 Indians among 17 killed in Dubai bus accident