पाकमध्ये दोन हल्ल्यांमध्ये 133 ठार 

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जुलै 2018

दहशतवाद संपला असल्याचे पाकिस्तान सरकारने आणि लष्कराने वारंवार सांगूनही या देशात अनेकदा दहशतवादी हल्ले होत असून, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तर हल्ल्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत दोन वेळेस असे हल्ले झाले आहेत. 

पेशावर/कराची : पाकिस्तानमध्ये 25 जुलैला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दोन नेत्यांवर शुक्रवारी दहशतवाद्यांनी बॉंबहल्ले केले. या हल्ल्यांमध्ये एका उमेदवारासह किमान 133 जण ठार झाले असून, जवळपास 160 जण जखमी झाले आहेत. 

पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या प्रांतांमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान हे हल्ले झाले. बलुचिस्तानमधील मस्तंग भागामध्ये बलुचिस्तान अवामी लीगचे नेते सिराज रायसनी यांची प्रचार सभा सुरू असताना दहशतवाद्यांनी सभेवर बॉंबहल्ला केला. यामध्ये शक्तीशाली स्फोटात किमान 133 जण ठार झाले, तर 160 जण जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या रायसानी यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यासाठी 15 ते 20 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनीसांगितले. या हल्ल्याच्या काही तास आधी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू भागामध्ये मुताहिदा मजलिस अलम या धार्मिक आघाडीचे उमेदवार अक्रमखान दुर्रानी यांच्या ताफ्यावरही दहशतवाद्यांनी हल्ला केला. दुर्रानी हे सभास्थानी पोहोचत असतानाच रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकीमध्ये लपवून ठेवलेल्या बॉंबचा स्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्यातून दुर्रानी हे बचावले असले तरी इतर पाच जण ठार, तर 37 जण जखमी झाले. 

दहशतवाद संपला असल्याचे पाकिस्तान सरकारने आणि लष्कराने वारंवार सांगूनही या देशात अनेकदा दहशतवादी हल्ले होत असून, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तर हल्ल्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत दोन वेळेस असे हल्ले झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 133 killed in twin blasts at poll rallies in Pakistan

टॅग्स