
अंगोलाच्या खाणीत गुलाबी हिऱ्याची चमक
जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) : अंगोलातील खाणीत १७० कॅरेटचा दुर्मिळ गुलाबी हिरा सापडला आहे. गेल्या ३०० वर्षांत सापडलेल्या गुलाबी हिऱ्यांमधील हा सर्वांत मोठा हिरा असल्याचा दावा केला जात आहे. या हिऱ्याला ‘लुलो रोझ’ असे नाव देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील ‘लुकापा डायमंड कंपनी’ने त्यांच्या संकेतस्थळावर याबाबत घोषणा केली आहे. लुकापा व तिच्या सहयोगी कंपन्यांना अंगोलातील लुलो खाणीत उत्खनन करताना हा हिरा सापडला. हा इतिहासातील सर्वांत मोठा गुलाबी हिरा असल्याचे कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘‘दहा हजार हिऱ्यांमध्ये एक गुलाबी हिरा सापडतो.
सर्वांत मोठा गुलाबी हिरा सापडणे म्हणजे अत्यंत दुर्मिळ गोष्ट सापडण्यासारखे आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टिफन वेदरऑल यांनी सांगितले. लिलावात गुलाबी हिऱ्याला निश्चितपणे मोठी रक्कम मिळेल, पण याच्या विशिष्ट रंगामुळे कोणत्या प्रकारचे शुल्क भरावे लागेल याची कल्पना नसल्याचे ते म्हणाले. लुलो ही गाळयुक्त खाण आहे. म्हणजे नदीच्या पात्रातून खडे शोधले जातात. लुकापा ही कंपनी साधारणपणे जमिनीखालील खडकाळ भागात हिरे शोधण्याचे काम करते. हिरे घेत असते. हिरे मिळण्याचा हा मुख्य स्रोत असतो जेव्हा तुम्हाला असे मौल्यवान मोठे हिरे सापडतात तेव्हा आमचा उत्साह नक्कीच वाढवतो, असे वेदरऑल यांनी कंपनीच्या ऑस्ट्रेलियातील मुख्यालयातून बोलताना सांगितले.
मौल्यवान हिरा
लुलो खाणीत सापडलेल्या हिऱ्यांमधील ‘लुलो रोझ’ हा पाचवा मोठा हिरा
या खाणीत १०० कॅरेट किंवा त्यापेक्षा जास्त वजनाचे २७ हिरे आतापर्यंत सापडले आहेत
गुलाबी हिरा अंगोलाच्या ‘सोडियम’ या हिरे बाजार कंपनीच्या मार्फत आंतरराष्ट्रीय निविदा काढून विकण्यात येणार
तीन हजार कॅरेटचा कलिनन
लुला खाणीत सापडलेला गुलाबी हिरा हा आकाराने मोठा असला तरी अनेक हिरे हे एक हजार कॅरेटपेक्षाही मोठे असतात. दक्षिण आफ्रिकेत १९०५ मध्ये सापडलेला कलिनन हिऱ्याचे वजन तब्बल तीन हजार १०६ कॅरेट होते. तो ब्रिटिश सार्वभौम राजदंडात आहे.
‘लुलो’मध्ये आढळलेल्या या नेत्रदीपक गुलाबी हिऱ्याने अंगोला हा हिऱ्यांच्या खाणीतील जगातील महत्त्वाचा देश असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
- डायमंडटिनो अझेव्हेदो, खनिज स्रोत व पेट्रोलियम आणि वायू मंत्री, अंगोला
Web Title: 170 Carat Lulu Rose Pink Diamond In Angolan Mine Johannesburg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..