घटस्फोटासाठी तब्बल 38 अब्ज डॉलरचा करार

वृत्तसंस्था
रविवार, 7 जुलै 2019

या करारानुसार मॅकेन्झी यांना ऍमेझॉन डॉट कॉममध्ये एक कोटी 97 लाख डॉलरचा हिस्सा मिळणार आहे. यात कंपनीतील 38.3 अब्ज डॉलर किमतीचे चार टक्के शेअर त्यांना मिळतील.

कॅलिफोर्निया : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले ऍमेझॉन या ऑनलाइन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस (वय 55) व त्यांच्या पत्नी मॅकेन्झी (वय 49) बेझोस यांच्या घटस्फोटप्रकरणी 38 अब्ज डॉलरची तडजोड निश्‍चित झाली असल्याचे वृत्त ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेने शुक्रवारी (ता.5) दिले. वॉशिंग्टनमधील किंग काउंटीच्या न्यायाधीशांनी घटस्फोटाची अंतिम बोलणी केली. या घटस्फोटानंतरही बेझोस हे जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरणार आहेत. 

या करारानुसार मॅकेन्झी यांना ऍमेझॉन डॉट कॉममध्ये एक कोटी 97 लाख डॉलरचा हिस्सा मिळणार आहे. यात कंपनीतील 38.3 अब्ज डॉलर किमतीचे चार टक्के शेअर त्यांना मिळतील. ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांना 22 वे स्थान मिळाले असल्याचे सांगण्यात आले. मॅकेन्झी या कादंबरीकार आहेत. 'वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्रातील आणि 'ब्लू ओरिजिनल' या अवकाश संशोधन संस्थेतील सर्व शेअर पतीला देणार असल्याचे मॅकेन्झी यांनी सांगितले. आपली निम्मी संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जेफ बेझोस व मॅकेन्झी विभक्त होणार असल्याची घोषणा जानेवारी महिन्यात केली होती. या दोघांचे 25 वर्षांचे वैवाहिक जीवन आता संपुष्टात येणार आहे. या दोघांचा विवाह 1993 मध्ये झाला होता. त्यांना चार मुले आहेत. जेफ यांचे माजी वृत्तनिवेदिका लॉरेन साचेंझ हिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे वृत्त 'नॅशनल इन्वायरर'ने दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 38 billion dollars deal for divorce