पाकिस्तानमधील दहशतवादाबाबत इम्रान खान यांची कबुली

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जुलै 2019

पाकिस्तानातील सरकारांनी खासकरुन मागील 15 वर्षांत सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी अमेरिकेला सत्य कधीच सांगितले नाही. पाकिस्तानमध्ये 40 विविध दहशतवादी संघटना सक्रिय होत्या. आम्ही दहशतवादाविरुद्ध अमेरिकेची लढाई लढत आहोत. 9/11 हल्ल्याशी आमचे काही देणेघेणे नाही.

वॉशिंग्टन : अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना कार्यरत होत्या अशी कबुली दिली. त्यामुळे दहशतवादाबाबत कायम हात झटकणाऱ्या पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे.

अमेरिकन काँग्रेसच्या शीला जॅक्सन ली कॅपिटोल हिल येथे आयोजित केलेल्या समारंभात इम्रान खान बोलत होते. इम्रान खान म्हणाले, की पाकिस्तानातील सरकारांनी खासकरुन मागील 15 वर्षांत सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी अमेरिकेला सत्य कधीच सांगितले नाही. पाकिस्तानमध्ये 40 विविध दहशतवादी संघटना सक्रिय होत्या. आम्ही दहशतवादाविरुद्ध अमेरिकेची लढाई लढत आहोत. 9/11 हल्ल्याशी आमचे काही देणेघेणे नाही. अल-कायदा अफगाणिस्तानात होती. पाकिस्तानात तालिबानचे दहशतवादी नव्हते. पण आम्ही अमेरिकेच्या लढाईत सहभागी झालो. दुर्देवाने जेव्हा काही गोष्टी चुकीच्या घडल्या तेव्हा मी माझ्या सरकारला दोष दिला. आम्ही जमिनीवरील खरी सत्य परिस्थिती अमेरिकेला सांगितली नाही. पाकिस्तानात 40 विविध दहशतवादी संघटना सक्रिय होत्या. पाकिस्तानसाठी तो असा काळ होता जेव्हा आमच्यासारख्या लोकांना आम्ही यातून वाचू का? ही भिती आमच्या मनामध्ये होती. दहशतवादाविरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी आम्ही आणखी काहीतरी करावे अशी अमेरिकेची अपेक्षा होती. पण पाकिस्तानचा त्यावेळी स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरु होता.

पाकिस्तानमध्ये अऩेक दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचे भारताकडून सतत सांगितले जाते. पण, पाकिस्तान दरवेळी हे झटकत असे. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा लष्करे तैयबाचा म्होरक्या हाफीज सईदला नुकतेच पाकिस्तानी सरकारने नजरकैदेत ठेवले होते. आता इम्रान खान यांनीच ही कबुली दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40 militant groups were operating in Pakistan says Imran Khan