इराकमध्ये आढळले श्रीराम-हनुमानाचे शिल्प

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

- भारतीय संशोधकांचा दावा
- आणखी अभ्यास करणार 

नवी दिल्ली : इराकमध्ये श्रीराम आणि हनुमान यांचे शिल्प सापडल्याचा दावा भारतीय संशोधकांनी आणि दूतावासातील अधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. परंतु, इराकमधील पुरातत्त्व खात्याने आणि संशोधकांनी या दाव्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. श्रीराम आणि हनुमान यांचे शिल्प इराकच्या दरबंद इ बेलुला येथील डोंगरावरील कड्यावर कोरलेले आढळून आले आहे.

भारताचे एक शिष्टमंडळ यावर्षी जूनमध्ये इराकला गेले होते. भारतीय राजदूत प्रदीप सिंह राजपुरोहित यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. या वेळी उत्तर प्रदेशच्या संस्कृती विभागांतर्गत असणाऱ्या अयोध्या संशोधन संस्थेला आग्रह करण्यात आला होता. या मोहिमेत सुलेमानिया विद्यापीठाचे इतिहासकार आणि कुर्दिस्तानचे इराकी गव्हर्नरदेखील सहभागी झाले होते. या शिष्टमंडळास इसपू 2000 मध्ये बेलुलाच्या डोंगरात कोरलेले शिल्प आढळून आले. या शिल्पात हातात धनुष्य घेतलेला एक राजा आणि पायाशी नतमस्त झालेला वानर दिसतो. 

अयोध्येतील संशोधन संस्थेचे योगेंद्र प्रतापसिंह यांनी हे शिल्प श्रीराम आणि हनुमानाचे असल्याचा दावा केला आहे. इराकी तज्ञांच्या मते, ही लेणी प्राचीन काळातील पर्वतात राहणाऱ्या आदिवासी प्रमुखांचे म्हणजे टार्डुनी यांचे प्रतीक आहे. याबाबत आणखी संशोधन करण्यासाठी अयोध्येच्या संशोधन मंडळांनी इराक सरकारकडे परवानगी मागितली आहे. त्यानंतर पुरावे एकत्र करून त्याचा अभ्यास केला जाईल असे सांगण्यात आले. यासंदर्भात सिंह म्हणाले की, मेसोपोटामियावर इसपू 4500 ते इसपू 1900 या कालावधीत सुमेरियन राज्य होते. सुमेरियन हे भारतातून इराकमध्ये पोचले आणि सिंधू प्रदेशातील संस्कृतीशी इराकशी संबंध जोडले गेले. हे शिल्प त्याचेच प्रतीक आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6000 year old Lord Rama and Hanuman carvings in Silemania Iraq