Viral Video: कपडे वाळत घालताना १९व्या मजल्यावरून घसरला आजीचा पाय, अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

china rescue

कपडे वाळत घालताना १९व्या मजल्यावरून घसरला आजीचा पाय, अन्...

काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या म्हणीचा प्रत्यय एका ८२ वर्षीय आजीला आला. कपडे वाळत घालत असताना या आजीचा पाय घसरला आणि इमारतीच्या १९ व्या मजल्यावरून त्यांचा तोल गेला. १९व्या मजल्यावरील बाल्कनीमधून घसरल्यानंतर त्या १८व्या मजल्यावर अडकून राहिल्या. चीनच्या China यंगझोमध्ये Yangzhou ही घटना घडली. बाल्कनीच्या कडेला त्या कपडे वाळत घालत होत्या. अचानक त्यांचा पाय घसरला आणि बाल्कनीतून खाली पडल्या. १८व्या मजल्यावरील बाल्कनीला त्या लटकल्या. सुदैवाने अग्निशामक दलाचे अधिकारी वेळेत घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आजीचे प्राण वाचवले.

अग्निशामक दलाची एक टीम अठराव्या मजल्यावर आणि दुसरी सतराव्या मजल्यावर होती. दोरीच्या सहाय्याने आजीला त्यांनी वाचवलं. या घटनेत सुदैवाने आजीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आजीला वाचवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दहा हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून नेटकऱ्यांनी अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे. 'आजीचे प्राण वाचवणाऱ्यांना सलाम', असं एकाने लिहिलं. तर 'अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी केली', असं दुसऱ्या युजरने लिहिलं.

मार्च महिन्यात व्हिएतनाममध्ये अशीच एक घटना घडली होती. दोन वर्षीय मुलगी १२ व्या मजल्यावरील बाल्कनीमधून खाली पडली. एका टॅक्सीचालकाने जेव्हा तिला खाली पडताना पाहिलं, तेव्हा तो लगेचच गाडीतून बाहेर येऊन इमारतीच्या खाली तिला वाचवण्यासाठी थांबला. १६४ फूट उंचावरून पडणाऱ्या मुलीला वाचवण्यात टॅक्सीचालकाला यश मिळालं.

loading image
go to top