कोरोनामुक्त झालेल्या 90 टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा आजार

वृत्तसंस्था
Friday, 7 August 2020

कोरोना महामारीचे केंद्र ठरलेल्या चीनमधील वुहान शहरातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

बिजिंग- कोरोना महामारीचे केंद्र ठरलेल्या चीनमधील वुहान शहरातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. वुहान शहरातील एका रुग्णालयात कोविड-19 मधून बरे झालेल्या एका समुहाचे नमुणे तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील 90 टक्के लोकांच्या फुफ्फुसांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शिवाय पाच टक्के रुग्ण पुन्हा कोरोनाग्रस्त झाल्याने त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 'हिंदुस्तान टाईम्स' या वृत्तपत्राने यासंबंधी माहिती दिली आहे. 

नव्या शैक्षिणक धोरणावर मोदी काय म्हणाले, वाचा भाषणातील प्रमुख मुद्दे

वुहान विश्वविद्यालयाच्या झोंगनन रुग्णालयातील अधिकारी पेंग झियोंग यांच्या नेतृत्वातील एक गट एप्रिलपासून बरे झालेल्या 100 रुग्णांना पुन्हा भेटून त्यांच्या आरोग्याची माहिती घेत आहेत. एक वर्षासाठी सुरु राहणाऱ्या या प्रक्रियेचा पहिला टप्पा जूलैमध्ये संपला. अभ्यासामध्ये समावेश असलेल्या रुग्णांची संख्या सरासरी 59 वर्षे आहे. चीनच्या ग्लोबल टाईम्सच्या बातमीनुसार, तपासणी करण्यात आलेल्या 90 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसांचे नुकसान झाले आहे. या रुग्णांची फुफ्फुसे अजूनही हवेचा प्रवाह व्यवस्थित करत नाहीयेत. 

पेंग यांनी रुग्णांवर एक परिषण केले. यात त्यांनी रुग्णांना सहा मिनिटे चालण्यास सांगितले. यावेळी रुग्णांनी सहा मिनिटात 400 मीटर अंतर पार केले. निरोगी व्यक्ती याच वेळेत 500 मीटर अंतर चालू शकतो. बिजिंग यूनिवर्सिटी ऑफ चायनीज मेडिसिनचे डोंगझेमिन रुग्णालयातील डॉक्टर लियांग टेंगशियाओ यांनी याबाबतीत माहिती देताना सांगितलं की, रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यावर तीन महिन्यानंतरही काही रुग्णांना ऑक्सीजन मशीनची गरज लागत आहे. 

सोन्यावर 90 टक्क्यांपर्यंत कर्ज, रिझर्व्ह बँकेचा निर्णय

लिंयांग यांचा गट कोरोनातून बरे झालेल्या 65 वर्षांवरील रुग्णांशी भेटून त्यांची माहिती गोळा करत आहे. अभ्यासातून असंही समोर आलेले आहे की, कोरोनातून बरे झालेल्या 100 रुग्णांपैकी 10 रुग्णांमध्ये आता कोरोनाविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज शिल्लक राहिलेल्या नाहीत. यातील पाच लोकांना पुन्हा कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. जेव्हा कोणताही विषाणू शरीरावर हल्ला करतो, त्यावेळी शरीरातील अँटीबॉडीज महत्वाची भूमिका बजावत असतात. 

दरम्यान, चीनमधील वुहान शहरामध्ये कोरोनाबाधित पहिला रुग्ण सापडला होता. चीनमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हा विषाणू जगभर पसरला. आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये तर या महामारीने अक्षरश: थैमान घातले आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील कोरोनाच्या उद्रेकासाठी चीनला जबाबदार ठरले आहे. शिवाय चीनमध्ये पुन्हा कोरोनाच्या उद्रेकाची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 90% of recovered Covid-19 patients have damaged lungs