esakal | खुशखबर! चार दिवसांच्या आठवड्याचा प्रयोग यशस्वी; ताणतणाव होतो कमी
sakal

बोलून बातमी शोधा

खुशखबर! चार दिवसांच्या आठवड्याचा प्रयोग यशस्वी; ताणतणाव होतो कमी

खुशखबर! चार दिवसांच्या आठवड्याचा प्रयोग यशस्वी; ताणतणाव होतो कमी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : आठवड्यातील कामाचे दिवस कमी केले तर कार्यक्षमता वाढते, ताणतणाव कमी होतो, व आरोग्यासह, कामातील व वैयक्तिक आयुष्यातील समतोल सुधारला असल्याची निरीक्षणे आइसलँडमधील संशोधकांनी नोंदविली आहेत. कामाचा आठवडा चार दिवसांचा करण्याचा प्रयोग युरोपमध्ये अत्यंत यशस्वी ठरला आहे. या देशातील कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांच्या आठवड्याच्या प्रयोगाचा निष्कर्ष संशोधकांनी नुकताच जाहीर केला. रिक्जाविक शहराची महानगरपालिका व स्थानिक प्रशासन यांच्या पुढाकाराने २०१५ ते २०१९ दरम्यान तेथील जवळपास अडीच हजार कर्मचाऱ्यांवर हा प्रयोग करण्यात आला. यामध्ये शाळा, कार्यालये, रुग्णालये व सामाजिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांची निवड केली होती.

हेही वाचा: Mumbai Blast : यासिन भटकळसह दोघांवर आरोप निश्चिती

ही संख्या आइसलँडमधील नोकरदार रोजगारक्षम लोकसंख्येच्या एक टक्के होती. या सर्वांचा कामाचा आठवडा चार दिवसांचा केला होता. कर्मचाऱ्यांच्या वेतनात अजिबात कपात न करता केवळ कामाचे दिवस कमी केले होते. चार दिवस कामामुळे ताणतणाव कमी झाला, आरोग्य, कामातील व वैयक्तिक आयुष्यातील समतोल सुधारला, कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवता येऊन स्वतःचे छंदही जोपासता येऊ लागल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
ब्रिटनमधील ‘ॲटोनॉमी’ हा विचार गट आणि आइसलँडमधील ‘असोसिएशन फॉर सस्टेनेबल डेमॉक्रसी (अल्डा) या संस्थेच्‍या दाव्यानुसार कामाचे दिवस कमी केले तरी उत्पादकता नुसती टिकून राहिली तर वाढली. आता आइसलँडमधील ८६ टक्के कर्मचाऱ्यांसाठी हा पर्याय लागू होणार आहे. स्पेन, न्यूझीलंडमध्येही असे प्रयोग सुरू झाले आहेत. ‘सार्वजनिक क्षेत्रातील कामकाजाच्या कमी कालावधीच्या आठवड्याची ही जगातील सर्वांत मोठी चाचणी होती, जी प्रचंड यशस्वी ठरली. सार्वजनिक क्षेत्र हे कमी दिवसांच्या आठवड्यासाठी अत्यंत योग्य आहे. या प्रयोगाचे उदाहरण अन्य सरकारांसमोर आहे, ’ असे ‘ॲटोनॉमी’चे विल स्ट्रेंज यांनी सांगितले.

हेही वाचा: सैन्यातील आणखी 147 महिलांना मिळाले स्थायी कमिशन

 • आधुनिक काळात कमी कामाबरोबरच कामात आधुनिक बदलही करता येऊ शकतात, हे आइसलँडमधील या संशोधनातून सिद्ध होते.
  - गुडमंडुर हेराल्डसन, संशोधक, ‘अल्डा’

  प्रयोगाचे निष्कर्ष
  - कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत व सर्जनशीलतेत वाढ
  -कर्मचाऱ्याचे वैयक्तिक राहणीमान सुधारले
  -आठवडाभर कामकाजाची पद्धत अशाश्वत
  -निरोगी, आनंदी कर्मचाऱ्यांमुळे संस्थेचीही प्रगती
  -अनेक खासगी कंपन्यांकडून या पर्यायाची चाचपणी

loading image