परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना जपानची दारे खुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accept visas from 98 countries for tourism Japan open doors to tourists  Tokyo follow Corona rules

परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना जपानची दारे खुली

टोकिओ : कोरोनामुळे डबघाईला आलेल्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी जपानने आजपासून परकी पर्यटकांवरील निर्बंध शिथिल केले. यानुसार व्हिसासाठीचे अर्ज स्वीकारण्यास सुरवात केली आहे.विशेष म्हणजे केवळ सामूहिक पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठीच जपानकडून सुविधा दिली जाणार आहे. पॅकेज टूरवर असलेले तसेच मास्क आणि कोरोनाचे नियमांचे पालन करणाऱ्या प्रवाशांनाच जपानमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. जपानच्या पर्यटन संस्थेने म्हटले की, अमेरिका, ब्रिटन, चीन, दक्षिण कोरिया, थायलंड आणि सिंगापूरसह ९८ देशांतील पर्यटकांचे व्हिसा अर्ज स्वीकारण्यास सुरवात करण्यात आली आहे. कोरोनाचा धोका कमी असलेल्या देशांतील पर्यटकांनाच जपानमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

परिवहन आणि पर्यटनमंत्री तेत्सुओ साईतो म्हणाले की, जपानला येणाऱ्या पर्यटकांवरील निर्बंध मागे घेतल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. देशात पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि आर्थिक उलाढाल यात संतुलन ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल. जपानच्या आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशात येणाऱ्या पर्यटकांना अधिकाधिक काळ मास्क घालणे बंधनकारक आहे. तसेच कोरोनाचे लक्षणे आढळून आल्यास उपचाराच्या खर्चासाठी विमा काढणे देखील आवश्‍यक आहे. जपानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या चौघांपैकी एकाचा जरी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संपूर्ण कुटुंबाचा प्रवास रद्द केला जाईल.

जपानने आंतरराष्ट्रीय सीमेवर कडक निर्बंध घातल्यानंतर जपान सरकारला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे १ जूनपासून काही प्रमाणात निर्बंध कमी केले आणि प्रवेशाची मर्यादा दुप्पट करत ती २० हजार प्रतिदिन केली. यात जपानी नागरिक, परकी विद्यार्थी आणि व्यावसायिक प्रतिनिधी यांना मुभा देण्यात आली. दररोज भेट देणाऱ्या लोकांत काही काळासाठी पॅकेज टूरवर असलेल्या पर्यटकांचा समावेश केला जाईल. त्याचवेळी वैयक्तिक पर्यटन करणाऱ्यांवर बंदी कायम ठेवली असून त्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोना संकटामुळे जपानमधील पर्यटन व्यवसाय ठप्प पडला आहे. त्यामुळे जपानचे सरकार परकी पर्यटकांना प्रोत्साहन देत असून त्यामुळे प्रसिद्ध पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी वाढू शकते. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढेल, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या देशात सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी, रुग्णालय आणि अन्य सार्वजनिक सुविधेच्या ठिकाणी

मास्कचे बंधन कायम ठेवले आहे. घराबाहेर असताना सभोवताली एखादी व्यक्ती नसेल किंवा मोठमोठ्याने कोणी बोलत नसेल तर मास्क काढता येणार आहे. कोरोनाची लाट आल्यानंतर २०२० मध्ये पर्यटकांचे जपानला भेट देण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत घसरले .त्यापूर्वीच्या वर्षात २०१९ मध्ये ३१.९ दशलक्ष पर्यटकांनी जपानला भेट दिली होती. यामुळे पर्यटन व्यवसायात ४ ट्रिलियन येन (३० अब्ज डॉलर) ची उलाढाल झाली. मात्र कोरोनाने हा बाजार ठप्प केला.

Web Title: Accept Visas From 98 Countries For Tourism Japan Open Doors To Tourists Tokyo Follow Corona Rules

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top