esakal | पंजशीर संघर्षात ३५० तालिबानी ठार; नॉर्दन अलायन्सचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

Panjshir

पंजशीर संघर्षात ३५० तालिबानी ठार; नॉर्दन अलायन्सचा दावा

sakal_logo
By
सुधीर काकडे

काबूल: अफगाणिस्तानातून (Afghanistan) अमेरिकेची माघार झाल्यानंतर तालिबानला (Taliban) मोकळे रान मिळाले आहे. अफगाणिस्तामध्ये तालिबानने आपले सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली देखील सुरु केल्या आहेत. मात्र याचवेळी दुसरीकडे अफगाणिस्तानचा एक प्रांत अजुनही तालिबान्यांला मिळवता आलेला नाही. नॉर्दन अलायन्सचा गड असलेला पंजशीरचा (Panjshir) भाग जिंकणे तालिबानला कठीण जात आहे. या क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी तालिबानचे दहशतवादी दररोज लढाई करत आहेत. काल रात्री तालिबान आणि नॉर्दन अलायन्स यांच्यात पुन्हा युद्ध झाले. या युद्धादरम्यान ३५० हून अधिक तालिबानचे दहशतवादी मारले गेल्याचा दावा नॉर्दन अलायन्सने केला आहे.

पंजशीर भागात सध्या घमासान लढाई सुरू आहे. काल तालिबानने गोलबहारहून पंजशीरला जोडणारा पूल उडवून दिला. सध्या युद्ध सुरू असल्याने पंजशीरच्या परवान प्रांताला जोडणारा मार्ग देखील बंद झाला आहे. एवढेच नाही तर तालिबानने मुख्य मार्गावर कंटेनर आणून ठेवले असून शुतूल जिल्ह्यावर ताबा मिळवला. नॉर्दन अलायन्सने या युद्धात ३५० हून अधिक तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला. मात्र त्यास दुजोरा मिळू शकला नाही. यावेळी मोठ्या प्रमाणात अमेरिकी शस्त्रे आणि गाड्या जप्त केल्या आहेत. ४० हून अधिक तालिबानी दहशतवाद्यांना ओलिस ठेवल्याचे नॉदर्न अलायन्सने म्हटले आहे. या घटनेला दुजोरा मिळू शकला नाही, मात्र तालिबानशी निगडित एका सोशल मीडियाच्या अकाउंटवर म्हटले की, पंजशीरमध्ये लढणाऱ्या मुजाहिदीनसाठी प्रार्थना करा. या पोस्टमुळे तालिबानची स्थिती कमकुवत असल्याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा: हेलिकॉप्टरला लटकणारा तालिबानी; अफगाण पत्रकाराने सांगितलं सत्य

अफगाणिस्तानच्या परवान प्रांतात जबाल सराज जिल्हा, बगलान प्रांतात अंदराब जिल्हा आणि खवाक पंजशीर येथेही संघर्ष झाला आहे. तालिबानकडून पंजशीर खोऱ्यात घुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. परंतु बंडखोरांकडून त्यांचा कडवा प्रतिकार केला जात आहे. काल रात्री ११ च्या सुमारास पंजशीरचे मुख असलेले गोलबहार भागात युद्ध झाले. अहमद मसूद याच्या नेतृत्वाखाली नॉर्दन अलायन्स तालिबानचा मुकाबला करत आहेत.

सोमवारी झाली मोठी चकमक

नॉदर्न अलायन्सच्या बंडखोरांनी सोमवारी रात्री देखील तालिबानच्या दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला. या चकमकीत सात दहशतवादी मारले गेले तसेच अलायन्स दोघे जखमी झाले आहेत. पंजशीरच्या बंडखोरांनी यापूर्वीही शंभरपेक्षा अधिक तालिबान्यांना ठार केल्याचे म्हटले आहे.

loading image
go to top