बलाढ्य चीनला अफगाणिस्तानने झुकवलं; एका महिलेसह 10 हेरांची गुपचूप सुटका

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 4 January 2021

हे गुप्तहेर चीनच्या विशेष विमानाने मायदेशी परतले आहेत. सर्व गुप्तहेर चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे.

अफगानिस्‍तान सरकारने चीनच्या 10 गुप्तहेरांना माफ करुन चोरुन मायदेशी पाठवल्याचे वृत्त आहे. या गुप्तहेरांना चार्टर्ड फ्लाइटमधून चीनला पाठवण्यात आले आहे. चिनी गुप्तहेरांना अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमध्ये दहशतवादी संघटना चालवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. हे गुप्तहेर चीनच्या विशेष विमानाने मायदेशी परतले आहेत. सर्व गुप्तहेर चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.

हिंदूस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, 25 डिसेंबर रोजी या चिनी गुप्तहेरांच्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला होता. त्यानंतर अफगाणिस्तानची सुरक्षा सेवा पुरवणाऱ्या एनडीएसने त्यांना अटक केली होती. अफगाणिस्‍तानने कोणत्या शर्तीवर गुप्तहेरांची सुटका केली हे अद्याप अस्पष्ट आहे. 

23 दिवस अफगाणिस्तान सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात होते हेर 

शनिवारी राष्ट्रपती अशरफ घनी यांच्या मंजूरीनंतर या हेरांना मायदेशी पाठवण्यात आल्याचे समजते. हे सर्व हेर 23 दिवस अफगाणिस्तान सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात होते. यापूर्वी अफगाणिस्तानचे उप राष्ट्रपती अमरुल्‍ला सालेहने चीनचे राजदूत वांग यू यांना प्रस्ताव दिला होता की, जर चीनने औपचारिक माफी मागितली तर पकडलेल्या हेरांना माफी देऊ, असे त्यांनी म्हटले होते. आता ही माफी मागितल्यानंतर हेरांची सुटका झाली की आणखी काही अटीशर्तींवर अफगानने चीनच्या हेरांना सोडले, हे गुलदस्त्यातच आहे.  

डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे अमेरिकेतील राजकारणात खळबळ

चिनी गुप्तहेर अफगानिस्तान सुरक्षा यंत्रणेच्या तावडीत अडकल्यानंतर चीनने ही बातमी दाबण्यावर जोर दिला होता. अफगानिस्तानने हेरांना पकडल्याची घोषणा करु नये, यावर चीनने जोर दिला होता. ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांतून यासंदर्भाती वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: afghanistan pardon chinese spies caught in kabul fly home in chartered aircraft