"डोकलाम'नंतर प्रथमच चीनचा तिबेटमध्ये युद्धसराव

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जून 2018

चीनने सराव केलेला किंघाई-तिबेट पठार हा अत्यंत विपरीत वातावरण असलेला प्रदेश असून, येथील भौगोलिक रचनाही गुंतागुंतीची आहे. या भागात तैनात असलेल्या सैनिकांना साधनसामग्री आणि इतर आवश्‍यक माहितीचा पुरवठा करण्यात नेहमीच अडचणी येत असल्याचा अनुभव आला आहे.

बीजिंग, ता. 29 (पीटीआय) : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) सुविधा आणि शस्त्रक्षमता यांची चाचणी घेण्यासाठी तिबेटमध्ये मंगळवारी (ता. 26) लष्करी सराव केला. डोकलाम वादानंतर चीनने प्रथमच या भागात सराव घेतला आहे. या सरावादरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद वाढविण्यावरही भर दिला गेला. 

चीनमधील "ग्लोबल टाइम्स'ने या सरावाबद्दल माहिती प्रसिद्ध केली आहे. नागरिकांचे सहकार्य असलेले शक्तिशाली लष्कर उभारणीचे चीनचे उद्दिष्ट असल्याने त्यामुळेच स्थानिक प्रशासन आणि कंपन्या यांचे सहकार्य घेत हा लष्करी सराव केला गेला. स्थानिक नागरिकांशी संवाद वाढविण्याचा चीन सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्‍यता असून, यामुळे अटीतटीच्या वेळी चिनी लष्कराला पाठबळ मिळू शकेल, असा विश्‍लेषकांचा होरा आहे. तिबेटमध्ये अद्यापही दलाई लामा यांचा प्रभाव असल्याने तो मोडून काढण्यासाठी चीनला या सरावाचा फायदा होऊ शकतो. 

चीनने सराव केलेला किंघाई-तिबेट पठार हा अत्यंत विपरीत वातावरण असलेला प्रदेश असून, येथील भौगोलिक रचनाही गुंतागुंतीची आहे. या भागात तैनात असलेल्या सैनिकांना साधनसामग्री आणि इतर आवश्‍यक माहितीचा पुरवठा करण्यात नेहमीच अडचणी येत असल्याचा अनुभव आला आहे. त्यामुळेच सैनिकांना तग धरून राहण्यास मदत व्हावी, त्यांना साधन पुरवठा करता यावा, बचाव मोहीम राबविता यावी आणि त्यांच्यापर्यंत जाण्याचा मार्ग निर्धोक राहावा, यासाठी चीन सरकारला स्थानिकांचे सहकार्य असणे महत्त्वाचे वाटत आहे.

या सरावादरम्यान, सैनिकांच्या एका गटाजवळील इंधन पुरवठा समाप्त झाल्यावर स्थानिक पेट्रोलियम कंपनीने त्यांना तातडीने इंधन पुरविले, तसेच एका स्थानिक प्रशासनानेही चिनी सैनिकांना अन्नपुरवठा केला, असे "ग्लोबल टाइम्स'ने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Doklam China TIbet war training