
Air India aircraft grounded in Milan after technical malfunction, leaving 255 Indian passengers stranded at the Italian airport.
Air India flight malfunction strands 255 Indian passengers in Milan: एअर इंडियाच्या ड्रीमलाइनर विमानातील तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) उड्डाण रद्द करावे लागले. यामुळे सणासुदीसाठी मायदेशी येणारे तब्बल २५५ भारतीय इटलीच्या मिलान शहारामध्ये अडकले आहेत. आता या प्रवाशांची राहण्या व्यवस्था तेथेच करण्यात आलेली. खरंतर एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर (VT-ANN) मध्ये यापूर्वी लांब पल्ल्याच्या मार्गांवर तांत्रिक बिघाड झालेला आहे.
एअरलाइनने याबाबत सांगितले की, "१७ ऑक्टोबर रोजी मिलानहून दिल्लीला जाणारी फ्लाइट एआय-१३८ तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आली. सर्व प्रवाशांच्या आणि क्रूच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले. सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मर्यादित उपलब्धतेमुळे, विमानतळाच्या आसपास राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे."
विमानातील बिघाडामुळे सणासाठी घरी जाणाऱ्या २५५ प्रवाशांच्या आणि १० हून अधिक क्रू सदस्यांच्या दिवाळी साजरी करण्याच्या आनंदावर पाणी फिरलं आहे. तर एका प्रवाशाच्या व्हिसाची मुदत २० ऑक्टोबर २०२५ रोजी संपत होती, त्यामुळे त्याला व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी भारतात पोहोचता यावे यासाठी ताबडतोब दुसऱ्या विमानाचे बुकींग करून दिले गेले. उर्वरित प्रवाशांना २० ऑक्टोबर किंवा त्यानंतरच्या नियोजित विमानांमध्ये पाठवण्याचे नियोजन आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, "एअर इंडिया आणि इतर विमान कंपन्यांवरील सीट उपलब्धतेनुसार, प्रवाशांना २० ऑक्टोबर किंवा त्यानंतरच्या नियोजित पर्यायी विमानांमध्ये पुन्हा बुकिंग करण्यात आले आहे. कंपनीने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत म्हटले आहे की, "आम्ही सर्व प्रवाशांना जेवण आणि आवश्यक सुविधा देऊ. आम्ही आमच्या प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि हितासाठी वचनबद्ध आहोत."