तेल अवीववरुन नवी दिल्ली व्हाया चक्क सौदी अरेबिया!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

आता इस्राईलला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांमध्ये आणि भारताला भेट देणाऱ्या इस्राईली पर्यटकांमध्ये मोठी वाढ होईल, याची मला खात्री आहे. हे पहिलेच पाऊल आहे. मात्र यामधून इस्राईल आणि या भागांमधील इतर देशांमधील दुवा बनण्याचे महत्त्वपूर्ण काम भारताने साधले आहे

तेल अवीव - तेल अवीववरुन निघालेले एअर इंडियाचे विमान काल (गुरुवार) नवी दिल्ली येथे पोहोचले. इस्राईलवरुन भारतात रोजच विमाने येतात. मात्र या विमानाचे उड्डाण ऐतिहासिक होते. भारत-इस्राईल व भारत-सौदी अरेबिया या दोन्ही द्विपक्षीय संबंधांमध्ये भारताने मिळविलेले यश त्यामधून अधोरेखित झाले होते. कारण इस्राईलवरुन निघालेले एअर इंडियाचे हे विमान चक्क सौदी अरेबियाच्या हवाई सीमेमधून भारतात आले!

इस्राईलमधून उड्डाण करणाऱ्या विमानांना सौदी अरेबियाच्या हवाई सीमेत प्रवेश करण्यासाठी असलेला प्रतिबंध हा अनेक दशके जुना आहे. मात्र भारताच्या या विमानासाठी यामधून सूट देण्यात आली.

""हा खरेच अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे. आपण एका नव्या युगात प्रवेश केला आहे. आता इस्राईलला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांमध्ये आणि भारताला भेट देणाऱ्या इस्राईली पर्यटकांमध्ये मोठी वाढ होईल, याची मला खात्री आहे. हे पहिलेच पाऊल आहे. मात्र यामधून इस्राईल आणि या भागांमधील इतर देशांमधील दुवा बनण्याचे महत्त्वपूर्ण काम भारताने साधले आहे,'' असे इस्राईलचे पर्यटन मंत्री यारीव लेव्हिन यांनी या पार्श्‍वभूमीवर म्हटले आहे.

सौदी अरेबियाच्या हवाई सीमेमधून गेल्याने एअर इंडियाच्या विमानाची इंधनबचत होणार आहेच; शिवाय तेल अवीव-नवी दिल्ली या प्रवासासही नेहमीपेक्षा 2.10 तास कमी लागणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air India makes history by flying to Israel via Saudi airspace