अल कायदाचा प्रमुख अल जवाहिरीचा मृत्यू; शेवटच्या क्षणी उपचार न मिळाल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

याआधी ओसामा बिन लादेनचा मुलगा हज्मा बिन लादेन आणि अलकायदाचा शक्तीशाली नेता अबु मोहम्मद अल मसरी याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता संघटनेत नेतृत्वावरून वादाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काबुल - जगातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना अल कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरीचा अफगाणिस्तानमध्ये  मृत्यू झालाचं वृत्त अरब न्यूजने दिलं आहे. अल जवाहिरीचा मृत्यू नैसर्गिक झाला असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. जवाहिरीला शेवटचं या वर्षी 9/11 हल्ल्याला 19 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पाहण्यात आलं होतं. दरम्यान, अरब न्यूजने जवाहिरीचा मृत्यू झाला असल्याची खात्री केलेली नाही. 

अरब न्यूने अल कायदाच्या एका ट्रान्सलेटरच्या हवाल्याने जवाहिरीचा गजनीमध्ये मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. यामध्ये म्हटलं आहे की, जवाहिरीचा अस्थमामुळे मृत्यू झाला आहे. त्याला वेळीच उपचार मिळू शकले नाहीत असंही सांगण्यात येतंय. पाकिस्तानच्या एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाल्याने असा दावा केला की, जवाहिरी आता जिवंत नाही. त्या अधिकाऱ्यानेसुद्धा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. 

हे वाचा - 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये सुनावली 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

अल कायदाच्या जवळच्या सूत्रांनीदेखील अशाच प्रकारचा दावा केल्याचं अरब न्यूजने सांगितलं असून अल जवाहिरीचा मृत्यू याच महिन्यात झाला असल्याचं म्हटलं आहे. काही लोक त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते असं सांगण्यात य़ेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि अफगाणिस्तानमध्ये त्याचा मृत्यू झाला. 

अरब न्यूजने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सुरक्षा सुत्रांनी माहिती दिल्याचं म्हटंल आहे. यामध्ये जवाहिरीचा मृत्यू झाला असं सांगितलं आहे. तसंच जर जवाहिरीचा मृत्यू झाला तर संघटनेच्या नेतृत्वासाठी भांडण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याआधी ओसामा बिन लादेनचा मुलगा हज्मा बिन लादेन आणि अलकायदाचा शक्तीशाली नेता अबु मोहम्मद अल मसरी याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता संघटनेत नेतृत्वावरून वादाची शक्यता व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Al-Qaeda chief-zawahiri-dead-afghanistan claim by arab news