26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये सुनावली 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानच्या न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 

इस्लामाबाद - मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानच्या न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा टेरर फंडिंगच्या दोन प्रकरणी सुनावण्यात आली आहे. पंजाबच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्याने फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण देश हादरला होता. 

दहशतवाद विरोधी न्यायालयाने जमात उद दावाच्या हाफिज सईदला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने सईदची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले असून 1 लाख 10 हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे. सईदचे दोन साथीदार जफर इकबाल आणि याहया मुजाहिद यांना साडेदहा वर्षांची शिक्षा झाली आहे. तर अब्दुल रहमान मक्की याला 6 महिन्यांचा तुरुंगवास झाला आहे. 

हे वाचा - चिनी हवाई हद्दीत अमेरिकेने पाठवली बॉम्ब फेकणारी विमाने; दिला सज्जड दम

संयुक्त राष्ट्रसंघाना हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. तर अमेरिकेनं त्याच्यावर एक कोटी अमेरिकन डॉलरचं बक्षिस ठेवलं आहे. गेल्या वर्षी 17 जुलै रोजी दहशतवाद्यांना पैसे पुरवल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. अशा दोन प्रकरणांमध्ये फेब्रुवारी महिन्यात दहशतवाद विरोधी न्यायालयाने त्याला 11 वर्षांची शिक्षा सुनावली होती. तो लाहोरमध्ये कडेकोट सुरक्षा असलेल्या लखपत इथल्या तुरुंगात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai terror attack mastermind hafiz saeed sentence 10 year jail in pak