थायलंडच्या गुहेत अडकलेल्या सर्वांची सुटका करण्यात अखेर यश

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जुलै 2018

या बचावकार्यातील भारताशी संबंधित महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मुलांची सुटका करण्यासाठी थायलंड सरकारने भारत सरकारला मदतीची विनंती केली होती. भारतातील किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) फ्लड पंप्स पाठविले होते. भारत सरकार व केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख व मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना झाली होती.

चियांग राइ (थायलंड) : थायलंडच्या उत्तरेकडील थाम लुआंग नांग या गुहेत अडकलेल्या 12 मुलांसह त्यांच्या एका प्रशिक्षकाला गुहेबाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला अखेर यश आले आहे. याबाबतची माहिती थायलंडच्या 'नेव्ही सिल'ने फेसबुक पेजवर दिली. 

23 जून रोजी 12 मुले व त्यांचे 25 वर्षीय प्रशिक्षक फुटबॉल खेळण्यासाठी या भागात गेले असता अचानक पाऊस सुरू झाला व आडोश्यासाठी ते या गुहेत गेले. पण मुसळधार पावसामुळे या गुहेच्या सर्व वाटा बंद झाल्या आणि मुले व प्रशिक्षक गुहेत अडकले होते. ही मुले नऊ दिवस केवळ पाण्यावर राहिली. दरम्यान रेस्क्यू टीमने त्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरू केले. प्रयत्नांची पराकाष्ठा करत तीन टप्प्यात मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आज अखेर या सर्वांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. बचाव कार्यात पाऊस हा मुख्य अडसर ठरत होता. 

दरम्यान, या बचावकार्यातील भारताशी संबंधित महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मुलांची सुटका करण्यासाठी थायलंड सरकारने भारत सरकारला मदतीची विनंती केली होती. भारतातील किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) फ्लड पंप्स पाठविले होते. भारत सरकार व केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख व मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना झाली होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All 12 boys and football coach rescued from cave