कोरोनाबाबत माहिती न देणं पडलं महाग; 'ॲमझॉन'ला पाच लाखांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amazon

कोरोनाबाबत माहिती न देणं पडलं महाग; 'ॲमझॉन'ला पाच लाखांचा दंड

न्यूयॉर्क : कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये पसरलेल्या संसर्गाबाबत इतर कर्मचाऱ्यांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती न पुरविल्याबद्दल कॅलिफोर्निया प्रशासनाने ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड ठोठावला असून तो भरण्यास तयार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

कॅलिफोर्नियामध्ये ‘ॲमेझॉन’चे दीड लाख कर्मचारी काम करतात. यातील बहुतेक कर्मचारी त्यांच्या शंभर गोदामात काम करतात. या ठिकाणी त्यांना मिळालेल्या सर्व ऑर्डरचे पॅकिंग होते आणि त्या नियोजित ठिकाणी पाठविल्या जातात. कामाच्या ठिकाणी कोरोना संसर्गाचे प्रकरण आढळल्यास इतर कर्मचाऱ्यांना आणि सरकारी आरोग्य अधिकाऱ्यांना एका दिवसाच्या आत कळविणे कंपन्यांना अथवा संस्थांना बंधनकारक आहे. कंपनीने अशा प्रकारची माहिती अद्ययावत ठेवली नाही, अशी तक्रार झाली होती. कॅलिफोर्नियामध्ये नव्यानेच झालेल्या कोविड माहिती हक्क कायद्याअंतर्गत प्रशासनाने कारवाई करत कंपनीला दंड ठोठावला. कंपनीने चूक कबुल करताना दंड भरण्याची तयारी दर्शविली असून आरोग्य यंत्रणा सुधारण्याचीही हमी दिली आहे.

कोरोना काळात कंपनीने त्यांच्या कार्यालयांमध्ये कोरोना परिस्थितीच्या केलेल्या हाताळणीवरून त्यांच्यावर अनेकदा टीका झाली आहे. सहकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब लपवून ठेवल्याबद्दल मिशिगनमधील कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात जाहीर नाराजी आणि संताप व्यक्त केला होता. न्यूयॉर्कमधील कर्मचाऱ्यांनी याच कारणावरून काम बंद आंदोलन केले होते.

टॅग्स :Amazon Company