प्रणव मुखर्जींसोबतचा फोटो शेअर करत काय म्हणाले जो बायडेन?

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 1 September 2020

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

वॉशिंग्टन- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी भारत आणि अमेरिकेने एकत्रित जागतिक आव्हानांना सामोरे जाण्याचे महत्व जाणून होते, असं म्हणत अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बायडेन यांच्यासह अमेरिकेतील अनेक प्रमुख नेत्यांनी आणि संघटनांनी मुखर्जी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. इतिहासात प्रतिष्ठित राज्यकर्ते आणि विद्वान म्हणून त्यांची नोंद होईल, असे गौरवोउद्गार त्यांनी काढले आहेत.

बांगलादेशकडून मुखर्जींना श्रद्धांजली, पंतप्रधान शेख हसीना यांनी जाहीर केला एक...

८४ वर्षीय ज्येष्ठ राजकारणी प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी ब्रेन सर्जरीसाठी त्यांना आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जवळजवळ २० दिवसांपासून प्रणव मुखर्जी ऑक्सिजन सपोर्टवर होते. शिवाय ते कोमामध्ये गेले होते. सोमवारी त्यांची प्रकृती अधिक बिघडत गेली. सायंकाळी ह्रदय बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. मुखर्जी यांच्या निधनानंतर सर्व स्तरावर दु:ख व्यक्त होत आहे.

जो बायडेन यांनी ट्विट करुन मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी एक फोटो शेअर केला असून यात ते मुखर्जी यांच्यासोबत दिसत आहे. 'राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी एक समर्पित लोकसेवक होते. अमेरिका आणि भारत मिळून जागतिक आव्हानांचा सामना करेल, असा त्यांचा विश्वास होता. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने आम्हाला दु:ख झाले आहे. आमच्या प्रार्थना त्यांच्या परिवारासोबत आणि भारतीयांसोबत आहेत', असं बायडेन म्हणाले आहेत. 

एक सिनेटर, पराराष्ट्र व्यवहार समितीचे एक सदस्य आणि त्यानंतर उप-राष्ट्रपती म्हणून जो बायडेन यांची प्रणव मुखर्जी यांच्यासोबत चांगली मैत्री होती. मुखर्जी अमेरिकेतील प्रसिद्ध भारतीयांपैकी एक होते. अमेरिका आणि भारताचे संबंध दृढ व्हावेत, यासाठी प्रणव मुखर्जी यांचे प्रयत्न महत्वाचे होते, असं राज्य उप सचिव स्टेफन बिगुन म्हणाले. मुखर्जी यांची नोंद इतिहासात एक प्रतिष्ठित राजकारणी आणि विद्वान म्हणून होईल. त्यांनी अनेक वेळा अमेरिकाला भेट दिली. भारत आणि अमेरिकेचे संबंध वाढावेत यासाठी त्यांचे हे प्रयत्न होते. दोन्ही देशातील संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार सुधारण्यावर त्यांनी भर दिला, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

दिलासादायक! मागील 24 तासात देशासह राज्याचा कोरोना रुग्णवाढ घटली

भारताने एक अप्रतिम राजकारणी गमावला आहे. ते भारत आणि अमेरिका संबंधाचे खंदे पुरस्कर्ते होते, असं यूएस इंडिया बिझनेस कॉन्सीलने ट्विट केलं आहे. न्यू यॉर्क टाईम्सने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा उल्लेख 'भारतीय राजकारणातील अपरिहार्य व्यक्ती' असा केला आहे. मुखर्जी यांची ५० वर्षांची कारकीर्द जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे चिरस्थायी उदाहरण आहे, असं पीट ओलसन म्हणाले.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america democratic leader joe biden tweet after pranav mukharjee death