अमेरिकी निवडणुकीत पुतीन यांचा हस्तक्षेप सिद्ध

पीटीआय
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

अमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा निश्‍चित सहभाग होता, असा दावा एका सूत्राच्या हवाल्याने अमेरिकी माध्यमांनी केला आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा निश्‍चित सहभाग होता, असा दावा एका सूत्राच्या हवाल्याने अमेरिकी माध्यमांनी केला आहे.

अमेरिकी हेराने रशिया सरकारकडील अत्यंत गोपनीय माहिती मिळवून ही बाब उघड केल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. गेल्या काही दशकांपासून रशिया सरकारमधील गुप्त माहिती हा हेर अमेरिकेला पुरवत आहे. त्याचा पुतीन यांच्याशी संपर्क येत असतो. त्याने पुतीन यांच्या टेबलावरील काही महत्त्वाच्या कागदपत्रांची छायाचित्रे अमेरिकेला पाठविली होती. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे काही मंत्री वारंवार अशा माहितीचा उच्चार करायला लागल्याने सावधगिरी म्हणून या हेराला 2017 मध्येच रशियाच्या बाहेर काढण्यात आले होते. त्याने दिलेल्या माहितीवरून ट्रम्प यांना निवडून आणण्यासाठी पुतीन यांनी स्वत: लक्ष घालून निवडणुकीत हस्तक्षेप केला होता, असे दिसून येते, असे माध्यमांनी म्हटले आहे. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे संकेतस्थळ हॅक करून त्यावरून दिशाभूल करणारे संदेश प्रसारित करण्याच्या रशियाच्या प्रयत्नांशीही हा हेर जवळून संबंधित होता, असे माध्यमांनी म्हटले आहे.

अमेरिकेत पुढील वर्षी पुन्हा अध्यक्षीय निवडणूक होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही माहिती उघड झाल्याने तिला महत्त्व आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: America Election vladimir putin Involve Politics