अमेरिकेने काश्‍मीरमध्ये नाक खुपसले

पीटीआय
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

फ्रान्सने हात झटकले
फ्रान्सनेही आज काश्‍मीर प्रश्‍न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही देशांनी राजकीय चर्चेच्या माध्यमातून मतभेद सोडवावेत तसेच तणाव वाढेल असे कोणतेही कृत्य करू नये, असे फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन येवेस ल ड्रायन यांनी म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीही याच मुद्द्यावरून चर्चा करण्याचे निमंत्रण त्यांना दिले होते. पण, त्यांनी मात्र याला नकार दिला होता.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्‍मीर प्रश्‍नात नाक खुपसताना येथील स्थिती विस्फोटक आणि जटिल असल्याचा दावा करीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली आहे. ट्रम्प यांनी या समस्येची धार्मिक अंगाने मांडणी करताना उभय देशांतील वाद मिटावा म्हणून आपण सर्वतोपरी मदत करू, असे म्हटले आहे.

‘‘काश्‍मीर ही खूप जटिल जागा असून, तेथे हिंदू आणि मुस्लिम दोघेही आहेत. या दोन्ही गटांमध्ये येथे फार ताळमेळ आहे, असा दावा मी करणार नाही. मागील अनेक वर्षांपासून ही समस्या प्रलंबित आहे, मी यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि भारताचे नरेंद्र मोदी या दोघांशीही माझे चांगले संबंध आहेत. या आठवड्याच्या शेवटी मी मोदींशीही चर्चा करणार आहे,’’ असे ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. या आठवड्याच्या शेवटीच फ्रान्समधील बियारतीज येथे ‘जी-७’ देशांचे संमेलन होणार असून, या संमेलनातच मोदी आणि ट्रम्प यांची भेट होणार आहे. चारच दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी याच मुद्द्यावरून सर्वप्रथम पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याशीही संवाद साधला होता, यानंतर त्यांनी पुन्हा खान यांच्याशी चर्चा केली होती.

बांगलादेशने आतापर्यंत नेहमीच प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याचे समर्थन केले असून, सर्वच देशांनी प्रादेशिक विकासाला प्राधान्य द्यायला हवे.
- शाहिदुल हक, परराष्ट्रमंत्री, बांगलादेश

अफगाणिस्तानातून माघार नाही
अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे काढून घेतले जाणार नाही. तालिबानने पुन्हा नियंत्रण प्रस्थापित करू नये म्हणून अमेरिका काळजी घेईल. त्यामुळे अफगाणिस्तानातील अमेरिकेची उपस्थिती कमी प्रमाणात का होईना कायम राहील, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानातील परिस्थितीवर आमची सदैव नजर असते.

गुप्तचरांकडून तेथील माहिती मिळत असते. अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य पूर्णपणे मागे घेतले जाणार नाही. तालिबानवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे अमेरिकेची उपस्थिती असेल, ट्रम्प यांनी सांगितले. 

सध्या अमेरिका, अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात शांतता चर्चा सुरू आहे. त्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, की आम्ही विविध पर्याय तपासून पहात आहोत. आम्ही अद्याप कुठल्याही निष्कर्षाला आलेलो नाही.

काश्‍मीरमध्ये दिवसभर निर्बंध शिथिल
श्रीनगर : काश्‍मीरमध्ये आज दिवसभर निर्बंध शिथिल करण्यात आले होते, शाळांची दारे खुली झाली असली तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी मात्र शाळांपासून दूर राहणे पसंत केले. स्थानिक प्रशासनाने राज्यभरातील शैक्षणिक संस्थांची दारे खुली करण्याचा आदेश दिला आहे. शहराचा मध्यवर्ती भाग सिव्हिल लाइन्स परिसरातील बंदोबस्त आज शिथिल करण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: America Mediation in Kashmir Dispute Donald Trump Pakistan