लस घेतल्यास किती दिवस पुन्हा होणार नाही कोरोना? ‘मॉडर्ना’ कंपनीचा खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 4 December 2020

मॉडर्ना आणि फायझर या कंपन्यांनी लस प्रभावी असल्याचे जाहीर केले आहे.

वॉशिंग्टन-  मॉडर्ना कंपनीच्या लशीमुळे तयार होणारी अँटीबॉडी शरीरात किमान तीन महिने टिकतात, असे एका अभ्यासातून दिसून आले आहे. ही लस कोरोना विषाणूवर ९४ टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही लस टोचवून घेतलेल्या ३४ स्वयंसेवकांमधील प्रतिकारशक्तीचा अभ्यास करून अमेरिकेच्या ॲलर्जी आणि साथरोग विभागाने हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या चाचणीचा अहवाल ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडीसिन’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. मॉडर्ना कंपनीच्या ‘एमआरएनए-१२७३’ या लशीमुळे शरीरात प्रतिजैविके निर्माण होऊन ती कोरोना विषाणूला मानवी पेशीमध्ये घुसण्यास विरोध करतात. या प्रतिजैविकांची क्षमता दिवसागणिक कमी होत जात असली तरी सर्वसाधारणपणे तीन महिने शरीरात सक्रीय असतात, असे अहवालात म्हटले आहे. तसेच, शरीरातील प्रतिकारशक्तीला विषाणूची ओळख पटल्यावर नंतरच्या काळात शरीरात आपोआपच प्रतिजैविके तयार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असेही साथरोग विभागाने म्हटले आहे. मॉडर्नाच्या लशीचे दोन डोस २८ दिवसांच्या अंतराने दिले जातात.

VIDEO: MLC निवडणुकीतील पराभवाने भाजप नेत्यांचा राग अनावर; पोलिसांना केली मारहाण

दरम्यान, अमेरिकेत काही लशी अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. मॉडर्ना आणि फायझर या कंपन्यांनी लस प्रभावी असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नियामक मंडळाने या लशींच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिल्यास डिसेंबरच्या शेवटापर्यंत किंवा जानेवारीच्या सुरुवातीला ती उपलब्ध होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर लोकांमध्ये लशीबाबत विश्वासार्हता वाढावी, यासाठी अमेरिकेतील महत्वाच्या व्यक्ती लस सर्वातआधी टोचून घेण्याची तयारी दाखवत आहेत. अमेरिकेचे तीन माजी अध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यू बूश कॅमेऱ्यासमोर सार्वजनिकरित्या कोविड-19 लस घेणार आहेत. नियोजित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हेही सर्वांसमोर लस टोचून घेतील. लोकांमध्ये लशीबाबत विश्वास निर्माण व्हावा, यासाठी असे करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america moderna compony said about corona vaccine antibody